कर्जत : तालुक्यातील पूर्व भाग हिरवागार करणाऱ्या राजनाला कालव्याचे पाणी दुबार शेतीसाठी २० डिसेंबर पूर्वी सोडले जाणार आहे. मुख्य कालवा, उजवा कालवा आणि पाली पोटल कालव्यामध्ये पाणी सोडले जाणार असल्याने किमान २२०० हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. तांबस येथील उजवा कालव्याला पडलेले भगदाड तात्पुरत्या स्वरूपात बुजविण्याचे काम पाटबंधारे विभागाचा यांत्रिकी विभाग करीत असून त्या पूर्ण कामाची निविदा अद्याप निघालेली नाही.
हुमगाव ते दहिवली या कालव्याच्या तांबस येथील भागात कालव्याचा तब्बल ४० मीटरचा भाग वाहून गेला आहे. त्या भागात एक मोरी, सोबत मातीचा भराव आणि कालव्यातील काँक्रीट देखील वाहून गेले होते. जुलै महिन्यात वाहून गेलेल्या तांबस आणि बारणे भागातील शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. त्या नुकसानीची शेतकºयांना अद्याप भरपाई मिळाली नाही, परंतु त्या ठिकाणी कालवा पूर्ववत करण्यासाठी पाटबंधारे खात्याने निविदा देखील काढली नाही. मात्र शेतकºयांची मागणी लक्षात घेऊन पाटबंधारे खात्याच्या यांत्रिकी विभागाने तांबस येथे तात्पुरत्या स्वरूपात दुरुस्तीचे काम सुरू केले आहे.
हुमगाव येथून मुख्य कालव्यातून आलेले दहिवलीपर्यत पोहचावे आणि शेतकºयांना दुबार भाताचे पीक घेता यावे यासाठी पाटबंधारे विभाग कामाला लागला आहे. या उजव्या कालव्यातून तब्बल ३४ गावातील शेती ओलिताखाली येणार असून १८०० हेक्टर क्षेत्र त्या भागात असून भाताचे पीक मोठ्या प्रमाणात राजनाला कालव्याचे पाण्यावर घेतले जाते. ही बाब लक्षात घेऊन दुरुस्तीच्या कामाची निविदा होईल तेंव्हा होईल पण शेतीला पाणी पोहचले पाहिजे यासाठी पाटबंधारे विभागाने कालव्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे.
दुरुस्तीचे काम अंतिम टप्प्यात असल्याने २० डिसेंबरपर्यंत राजनाला मुख्य कालव्यातून पाणी डावा, पाली - पोटल कालव्यात शेतीसाठी सोडले जाणार आहे. २० डिसेंबर पूर्वी शेतीसाठी पाणी सोडता यावे यासाठी पाटबंधारे विभागाचे उपअभियंता अजय कदम यांच्यासह पाली पोटल कालव्याच्या शाखा अभियंता स्नेहल कापडे तसेच उजवा कालव्याची जबाबदारी असलेले शाखा अभियंता भरत काटले हे नाल्याची काम पूर्ण करून घेत आहेत. या सर्व कामांमुळे काही दिवस उशिरा राजनाला कालव्यात पाणी सोडले जाणार आहे.कालव्यात पाणी सोडण्याचे नियोजन आधीच ठरलेले असते, मात्र यावेळी राजनाला कालव्याचा मोठा भाग पावसाच्या वाहून गेला होता. त्या कामासाठी आम्ही कोलाड विभागाच्या कार्यालयात दुरुस्तीचे अंदाजपत्रक बनवून पाठवले होते. मात्र ते निविदा स्तरावर येण्यास उशीर झाल्याने कामे वेळेवर झाली नाहीत. त्या स्थितीत शेतकºयांची पाणी सोडण्याची आग्रही मागणी लक्षात घेऊन आम्ही आमच्या यांत्रिक विभागाकडून तात्पुरती दुरुस्तीची कामे सुरू केली आहेत. त्यामुळे काही दिवस उशिरा पाणी सोडले जाईल.- अजय कदम, उपअभियंता,पाटबंधारे विभाग