जलवाहिनीला लागली गळती
By admin | Published: May 25, 2017 12:22 AM2017-05-25T00:22:44+5:302017-05-25T00:22:44+5:30
संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत असून, अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : संपूर्ण महाराष्ट्रात पाणीटंचाईच्या तीव्र झळा जाणवत असून, अनेक ठिकाणी हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. असे असताना, जवळील मोरबे डॅममधून नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीला मागील दोन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. यामधून १५ ते २० फूट उंचीचे पाण्याचे फवारे उडत आहेत. मागील दोन दिवसांपासून या जलवाहिनीमधून लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
मोरबे धरण नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे असून, नवी मुंबईला पाणीपुरवठा होतो. ही जलवाहिनी मुंबई -पुणे हायवेलगत टाकण्यात आली आहे. चौकपासून काही अंतरावर असलेल्या बारवाई गावाजवळ ही जलवाहिनी फुटल्याने त्यामधून प्रचंड दाबाने पाणी बाहेर पडत आहे. या पाण्याचे फवारे जलवाहिनीलगत असणाऱ्या हायवेवरून जाणाऱ्या वाहनांवर उडत आहेत. त्यामुळे अचानक वाहनांच्या काचेवर जोरात पाणी पडत असल्याने वाहनचालक गोंधळून त्याचा वाहनावरील ताबा सुटून अपघाताची शक्यता आहे. तर काही वाहनचालक संधीचा फायदा घेत, भर रस्त्यात फवाऱ्याखाली गाडी उभी करून भर उन्हात गारव्याचा आनंद लुटत आहेत. संबंधित शासकीय प्रशासनाने दखल घेऊन जलवाहिनी गळती रोखावी, अशी मागणी होत आहे.