पुरामुळे नागोठणे जलमय; लाखो रुपयांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 12:43 AM2019-08-05T00:43:02+5:302019-08-05T00:43:13+5:30

अडकलेल्या २० जणांची सुटका

Waterlogged by floods | पुरामुळे नागोठणे जलमय; लाखो रुपयांचे नुकसान

पुरामुळे नागोठणे जलमय; लाखो रुपयांचे नुकसान

Next

नागोठणे : शनिवारी सायंकाळपासून पावसाने पुन्हा एकदा रौद्ररूप धारण केल्याने मध्यरात्री येथील अंबा नदीने पुन्हा एकदा आपले पात्र ओलांडून शहरात प्रवेश केल्याने नागरिकांची तसेच व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. पुरात अडकलेल्या २० जणांना रविवारी सकाळी सुखरूप बाहेर काढण्यात यश आल्याने कोठेही जीवितहानी झाली नाही. खा. सुनील तटकरे आणि आ. अनिकेत तटकरे यांनी सकाळी, तर भाजपचे नेते माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी दुपारी चार शहरात येऊन पूरग्रस्त भागाची पाहणी करून नागरिकांना दिलासा दिला.

मध्यरात्रीच्या दरम्यान येथील अंबा नदीने शहरात प्रवेश केला होता. पुराचे पाणी वेगाने वाढत आहे, असे नागरिकांच्या लक्षात आल्याने घरातील साहित्य घरातच सोडून त्यानी सुरक्षित ठिकाणी जाऊन आसरा घेतला, तर व्यापारी बांधवांनी दुकानातील माल सुरक्षित ठिकाणी हलविला असला तरी, पाण्याची पातळी प्रचंड प्रमाणात असल्याने अनेकांचा माल भिजून खराब झाला.

सरपंच डॉ. मिलिंद धात्रक, ग्रा.पं. सदस्य शैलेंद्र देशपांडे, ज्ञानेश्वर साळुंके, ग्रामविकास अधिकारी मोहन दिवकर, मंडळ अधिकारी अरुण गणतांडेल, अनंत म्हात्रे, शिवाजी केंद्रे यांचेसह पोलीस तसेच ग्रामपंचायत कर्मचारी यांनी संभाव्य पुराची परिस्थिती लक्षात घेऊन मध्यरात्रीपासून पूरग्रस्त भागात फिरून नागरिकांना घरातून बाहेर पडण्याच्या सूचना देण्याचे काम केले होते. रविवारी पहाटेच्या दरम्यान शिवाजी चौकलगत राहणारे काळे कुटुंबीय पुराच्या पाण्यात अडकून पडले असल्याचे निदर्शनास आणून दिल्यावर कोलाडच्या एनआरएस टीमला पाचारण करण्यात येऊन घरात अडकलेल्या पाचही जणांना सात वाजता सुखरूप बाहेर काढण्यात आले.

रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास याच चौकात असणाºया भाजी मार्के ट तसेच मनिष फरसाण मार्ट आणि साईप्रसाद हॉटेलमधील १५ कामगार पुरात अडकून पडले असल्याचे दिसून आले होते. याचवेळी नागोठण्याची पाहणी करण्यासाठी आलेले आ. अनिकेत तटकरे यांच्या ही बाब लक्षात आणून दिल्याने त्यांनी तातडीने सूत्रे हलवून दोन होडींसह कोलाडच्या एनआरएस पथकाला पुन्हा पाचारण केले. दुपारी १२ वाजता या पथकाने पंधराही जणांना सुखरूप बाहेर काढून मोहीम यशस्वी केली. पहाटेपासून आम्ही मदतीच्या प्रतीक्षेत होतो व आठ तासानंतर आम्ही बाहेर आलो, असे एका कामगाराने लोकमतशी बोलताना सांगितले.

त्यापूर्वी खासदार सुनील तटकरे यांनी सकाळी ९ वाजता शहराला भेट देऊन बंगले आळी, बाजारपेठ, खुमाचा नाका, मोहल्ला आदी पूरप्रवण क्षेत्रात फिरून पूरपरिस्थितीचा आढावा घेतला व सरकारी यंत्रणेला सूचना केल्या. रोह्याच्या तहसीलदार कविता जाधव यांनी सकाळी, तर प्रांताधिकारी रवींद्र बोंबले यांनी दुपारी शहरात फिरून पूरपरिस्थितीची पाहणी केली. या महापुरात लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज असून या अधिकाऱ्यांकडून स्थानिक महसूल यंत्रणेला तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याचा आदेश दिला.

रविवारी दुपारपर्यंत एसटी बसस्थानक, शिवाजी चौक तसेच कोळीवाडा भागात १५ फूट, बाजारपेठ सहा ते सात फूट, तर रिलायन्स चौक, मरिआई मंदिर आणि शांतीनगराच्या काही भागात तीन ते चार फूट पुराच्या पाण्याची पातळी होती. पावसाची संततधार कायम चालू असली तरी दुपारी तीन नंतर पुराचे पाणी ओसरावयास प्रारंभ झाला होता. पुराचे पाणी पूर्णपणे ओसरल्यावर नुकसानीचा अंदाज येऊ शकेल, असे शासकीय यंत्रणेकडून स्पष्ट करण्यात आले. शहराचा विद्युत पुरवठा मध्यरात्रीपासून खंडित झाला होता. पुराचे पाणी गेल्यावर सर्व ठिकाणी जाऊन पाहणी केल्यावरच विद्युत पुरवठा पूर्ववत चालू करण्यात येईल, असे विद्युत वितरण कंपनीच्यावतीने सांगण्यात आले.

Web Title: Waterlogged by floods

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :floodपूर