पाली नगरपंचायत होण्याचा मार्ग झाला मोकळा; नगरविकास विभागाची अधिसूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 11:57 PM2021-01-01T23:57:20+5:302021-01-01T23:57:30+5:30
नगरविकास विभागाची अधिसूचना : तहसीलदारपदी दिलीप रायन्नावार यांची नियुक्ती
विनोद भोईर
पाली: अष्टविनायकाचे तीर्थक्षेत्र असलेल्या पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याची प्रक्रिया मागील साडेपाच वर्षांपासून लालफितीत अडकली होती. मात्र, पाली ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीत रूपांतर होण्याचे पालीकरांचे स्वप्न आता साकार होणार आहे. या संदर्भातील अधिसूचना महाराष्ट्र नगरविकास विभागाने गुरुवारी (ता.३१) जारी केली आहे आणि त्यानुसार नगरपंचायत स्थापित होईपर्यंत पाली-सुधागड तहसीलदार दिलीप रायन्नावार प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत.
महाराष्ट्र शासनामार्फत रायगड जिल्ह्यातील पालीसह अन्य सहा ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचातीत होण्याची प्रक्रिया झाली होती. मात्र, तत्कालीन सरपंच व सदस्यांनी पाली ग्रामपंचायत राहावी, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती, तसेच दरम्यानच्या काळात पाली नगरपंचायत होण्याच्या प्रक्रियेत नगरपंचायतीची जाहिरात प्रसारमाध्यमात प्रसिद्ध न झाल्याच्या कारणाने नगरपंचायत प्रस्तापित होऊ शकली नव्हती. त्यामुळे पाली ग्रामपंचायत जैसेथे राहिली. या सर्व कालखंडात कधी जिल्हा परिषदेचा प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी तर कधी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून तहसीलदार यांनी प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामपंचायतीचा कारभार सांभाळला. मात्र, लोकप्रतिनिधींअभावी नागरिकांच्या विविध समस्या सोडवणुकीस दिरंगाई होत होती.
मूलभूत प्रश्न मार्गी लागण्यास अडचणी येत होत्या. त्यानंतर, जुलै, २०१८ मध्ये ग्रामपंचायतीचा ५ वर्षांचा कार्यकाळ (मुदत) संपल्याने पुन्हा एकदा पाली ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची अधिसूचना जाहीर झाली. मात्र, यावेळी सर्व राजकीय पक्ष, नेते व नागरिकांनी ग्रामपंचायत निवडणुकीवर बहिष्कार टाकत नगरपंचायत होण्याची मागणी केली होती. दरम्यान, पाली नगरपंचायत व्हावी, यासाठी पालीतील पराग मेहता, गजानन शिंदे, अभिजीत चांदोरकर, सुधीर साखरले, संजोग शेठ व आशिक मनियार आदी नागरिकांनी सर्व कागदपत्रासह उच्च न्यायालयात महाराष्ट्र शासनाविरोधात जनहित याचिका दाखल केली.
त्यानंतर, २६ सप्टेंबर, २०१८ रोजी पाली ग्रामपंचायतीची निवडणुक प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत नगरपंचायतीची मागणी करत राजकीय पक्षांनी पुन्हा एकदा बहिष्कार टाकला होता, तर अपक्ष उमेदवारांनी मात्र नगरपंचायत होईल तेव्हा होईल, हा पवित्रा घेत, ग्रामस्थांचे प्रश्न सोडविण्यासाठी या ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. त्याचप्रमाणे, अपक्षांनी ग्रामपंचायत निवडणुकीत उडी घेतली. ग्रामपंचायतिचे कामकाज आत्तापर्यंत सुरू राहिले.