जिल्हा परिषदेच्या १८ शाळा बंद, सुधागड तालुक्यातील आणखी पाच शाळा बंद होण्याच्या मार्गावर
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 03:58 AM2019-02-06T03:58:20+5:302019-02-06T03:59:13+5:30
सुधागडात जिल्हा परिषदेच्या एकूण १५४ शाळा आहेत. त्यापैकी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत १८ शाळा बंद झाल्या असून २०१९ मध्ये ४ ते ५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
- विनोद भोईर
पाली - सुधागडात जिल्हा परिषदेच्या एकूण १५४ शाळा आहेत. त्यापैकी २०१२ ते २०१८ या सहा वर्षांच्या कालावधीत १८ शाळा बंद झाल्या असून २०१९ मध्ये ४ ते ५ शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे परिसरातील पालकांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.
बंद पडलेल्या शाळा तोरंकेवाडी, मढाळी, कासारवाडी, कळंबोशी, कळंब धनगरवाडी, खेमवाडी, केवणी धनगरवाडा, बलाप, रासळवाडी, कोंडगाव, गोंडाळे, हरनेरी, विडसई, मुळशी, वेळकरपाडा, शासकीय माध्यमिक आश्रमशाळा नेणवली या शाळांचा समावेश आहे. यातील ९ ते १० शाळेच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. तालुक्यातील खासगी व इंग्रजी माध्यमाच्या शाळा असल्याने आपल्या मुलाला, मुलीला दर्जेदार शिक्षण मिळावे या हेतूने पालक खासगी शाळेत पाठवले जात आहेत. त्याचबरोबर शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिक्षण घेत असल्याने खेड्यातील पालकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. तसेच आदिवासीचे स्थलांतर होणे थांबले नाही व खेडोपाड्यातील नागरिकांना रोजगाराचा प्रश्न भेडसावत आहे. त्यामुळे खेड्यातून शहराकडे जाण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे गावातील शाळेत शासनाच्या नियमानुसार पटसंख्या कमी असल्याने या १८ शाळा बंद पडल्या.
डोंगराळ भागात असणाऱ्या शाळा बंद झाल्याने परिरिथती चांगली नसल्याने बाहेर जाऊ न शकणाºया मुलांना शिक्षणाविना रहावे लागत आहे. तसेच दूरवरून पायपीट
करून शाळेत येण्यास लहान मुले कंटाळतात.
शासनाच्या नियमानुसार जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थ्यांची पटसंख्या २०असली पाहिजे त्यापेक्षा कमी असल्यास शाळा बंद करा यामुळे पट कमी असलेल्या शाळा बंद झाल्या आहेत.
- अनिल कुलकर्णी, गट शिक्षण अधिकारी सुधागड पाली,
शाळा बंद झाल्याने तालुक्याच्या ठिकाणी येण्यासाठी ३४ किलोमीटर ये-जा करावी लागत आहे. त्यावर शासनाने नांदगाव पंचक्र ोशीतील बंद झालेल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना केंद्र शाळेत व्यवस्था करावी व येण्या-जाण्यासाठी गाडीभाडे द्यावे.
- निखील बेलोसे, पालक
जिल्हा परिषदेच्या शाळा बंद झाल्याने मुलांच्या शिक्षणासाठी गाव सोडून तालुक्यातील मुख्य ठिकाण पाली येथे यावे लागले.
- नूतन उतेकर, पालक
पालकांचा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे कल वाढल्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होऊन शाळा ओस पडत आहेत.
खेड्यात शिक्षणव्यवस्थेचे तीनतेरा
शासन शिक्षणावर विविध योजना आखत असले तरी आजवर खेडोपाड्यात शिक्षणव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले दिसत आहे.शिक्षण व्यवस्था राखण्यासाठी मोठ्याप्रमाणात शासन खर्च करत आहे.
परंतु खासगीकरणामुळे आदिवासी गोरगरीब पालकांना आपल्या मुलांना शाळा बंद झाल्याने सुविधा नसल्याने नाइलाजाने खासगी शाळेत पाठवावे लागत आहे व तेथील शाळेत भरमसाठ आकारलेली फी भरावी लागत आहे. मग शासन निधी आमच्या काय कामाचा असा प्रश्न पालकांना सतावत आहे.
सुशिक्षितांना रोजगार मिळाल्यास व आदिवासींचे स्थलांतर थांबल्यास खेडोपाड्यातील शाळांची पटसंख्या वाढू शकते. त्याचबरोबर वेळापत्रकाशिवाय विद्यार्थ्यांच्या विविध गुणांकडे लक्ष दिल्यास खासगी शाळेमध्ये प्रवेश घेण्याची संख्या कमी होऊ शकते.
- निहारिका शिर्के , महिला अध्यक्ष, सुधागड मराठा समाज
सर्व शिक्षण अभियानांतर्गत विद्यार्थ्यांनी शिकावे याकरिता शासनाने अनेक सोयीसुविधा दिल्या असून या सुविधा विद्यार्थ्यांपर्यंत पोहचवण्यात जि.प. शाळा अयशस्वी ठरल्याने खासगी शाळेचे फावले आहे. यात बदल घडल्यास जि.प.शाळेचा पट वाढू शकतो.
- अमित गायकवाड, तालुकाध्यक्ष,
भारिप बहुजन महासंघ सुधागड