अलिबाग : रायगड लोकसभा मतदारसंघात प्रचाराची सांगता झाली असून निवडणूक प्रशासनाने निवडणुकीची सर्व तयारी केली आहे. आम्ही निःपक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी तयार आहोत. तुम्हीही निर्भयपणे मतदान करा, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी किशन जावळे यांनी पत्रकार परिषदेत केले.
यावेळी जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ जावळे, जिल्हा निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहा उबाळे, निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के उपस्थित होते. जावळे यांनी आपल्या तयारीचा आढावा यावेळी मांडला. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, दिव्यांगांसाठी रॅम्प, प्राथमिक आरोग्य सुविधा, पाचपेक्षा अधिक मतदान केंद्रे असलेल्या मतदान केंद्रांवर बैठक व्यवस्था, मंडप उभारणी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मतदारांनी मतदानापूर्वी आपल्या मतदान केंद्राची माहिती घ्यावी असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
तुमचे मतदान केंद्र असे शोधामतदारांना मतदान चिठ्ठीद्वारे कुठे मतदान करावयाचे हे सांगितले आहे. आतापर्यंत ९८ टक्के मतदारांना या चिठ्ठीचे वाटप केले आहे. उर्वरित दोन टक्के मतदारांनाही चिठ्ठीचे वाटप केले जाईल. याशिवाय मतदार सहायता केंद्र स्थापित केले आहेत. निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.eci. gov.in/ या संकेतस्थळावर किंवा ॲपद्वारेही ही माहिती मिळू शकेल.
रोख रक्कम, मद्यसाठा जप्तरायगड लोकसभा मतदारसंघात १६ मार्च ते ३ मे या कालावधीत स्थिर सर्वेक्षण पथकाद्वारे ७ लाख ४० हजार रोख रक्कम तर उत्पादन शुल्क विभागाकडून ६८ लाख ६१ हजार ७३० रुपयांची दारू व मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दहा हजार कर्मचारीया निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरविण्यात आली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदान कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. पोलिस बंदोबस्तही पुरविण्यात आला आहे. ७ हजार २९१ मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी व पोलिस असे दहा हजारांचे मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. रायगड लोकसभा मतदारसंघाकरिता होणारी संपूर्ण निवडणूक प्रक्रिया निःपक्ष, निर्भय, निकोप आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. सर्व मतदान केंद्रांवर सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. - किशन जावळे, जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी. ५७ तक्रारी प्राप्तजिल्ह्यात सी-व्हिजिल ॲपवर आचारसंहिता भंगाबाबतच्या ५७ तक्रारी, एनजीएसपी पोर्टलवरील १५६८ प्राप्त तक्रारींपैकी १५४० तक्रारी, ५ लेखी तर दूरध्वनी क्र. १९५० वर आलेल्या २०४ तक्रारींवर उचित कार्यवाही करून त्या निकाली काढण्यात आल्या आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मतदानमतदानाची सर्वसाधारण वेळ सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत आहे. मात्र, मतदान केंद्रावर सायंकाळी ६ वाजेपर्यंत जेवढे मतदार उपस्थित असतील त्या सर्वांची मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत हे मतदान केंद्र सुरू राहणार आहे.