अभय पाटील बोर्ली पंचतन : मागच्या वर्षी समुद्रातील अनेक वादळे झाली. त्यानंतर कोरोना व आता निसर्ग चक्रीवादळ या तिहेरी संकटातून मच्छीमार गेला. अनेक वादळांना निर्भयपणे सामोरा जाणारा कोळीबांधव खरंच आता उपसमारीच्या मोठ्या संकटाशी झुंजतोय. आमचा संसार आता उघड्यावर पडला आहे. शासन आता कसली वाट पाहतेय? तत्काळ मदत न जाहीर केल्यास शासनावरचा विश्वास उडेल, अशी प्रतिक्रिया वादळग्रस्त दिघी येथील मच्छीमार किरण कांदेकर यांनी व्यक्त केली.निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन समुद्रकिनारपट्टीवर बेफाम प्रकोप केला. यामध्ये घरांचे, बागायतदारांचे खूप नुकसान झाले. त्यामध्ये समुद्रकिनाऱ्याला नांगरून ठेवलेल्या मच्छीमार बोटींचेदेखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रशासनाच्या मत्स्य विभागाच्या वतीने बोटींचे पंचनामे करण्यात आले, परंतु अद्याप नुकसानग्रस्त बोटींच्या मालकांना म्हणजेच कोळी बांधवांना कोणत्याही प्रकारची भरपाई मिळालेली नाही. घराचे छप्पर उडाले, भिंतींना तडे गेले, पंचनामे झाले, पण त्यातही मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोळी बांधवांच्या नशिबी उपेक्षाच आली असल्याची खंत कोळी बांधवांकडून व्यक्त होत आहे. तर शासनाने मच्छीमार बांधवांसाठी वेगळी आर्थिक तरतूद करून तातडीने मदत मिळावी, अशी मागणीदेखील होत आहे.श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन, भरडखोल, आदगाव, दिघी, कुडगाव या समुद्रकिनारी असलेल्या गावांमध्ये मच्छीमार बांधवांची वस्ती आहे. यांचा प्रमुख व्यवसाय मच्छीमारी हाच असून काही कुटुंबांतील सदस्य मुंबई येथे कामानिमित्त आहेत. वादळाने गावातील सर्वच घरांचे नुकसान झाले आहे. झाडाची सुकलेली पाने दूरवर उडून जातात तशी घरांची कौले, पत्रे उडाली. पावसाळ्याकरिता साठवलेले धान्य, वस्त्रे, घरातील टीव्ही, फ्रीज, संगणक यांसारख्या विविध साहित्यांचे नुकसान झाले. वादळाच्या भीतीने बरीच कुटुंबे आश्रयाला दुसºया ठिकाणी गेली. दुरुस्तीकरिता पैसे नसल्याने निवाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. २१ दिवस उलटूनदेखील कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नसल्याचे कोळी बांधवांनी सांगितले.>२०० पेक्षा अधिक नौकांचे नुकसाननिसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यातील सुमारे २०० पेक्षा जास्त नौकांचे नुकसान झाले असून अनेक मच्छीमारी नौका निकामी झाल्या आहेत.तसेच गावातील मच्छीमारांना डिझेलपुरवठा करणाºया मच्छीमारी सहकारी संस्थांच्या छपरांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे.नुकसान झालेल्या नौकांमध्ये १ सिलिंडर, २ सिलिंडर, ३ सिलिंडर, ४ सिलिंडर तसेच ६ सिलिंडरच्या नौकांचा समावेश आहे. त्यांना आर्थिक मदत अनुदान स्वरूपात द्यावी, अशी मागणी केली जात आहे.>निसर्ग चक्रीवादळाने आमच्या मच्छीमारांच्या राहत्या घरासहित बोटींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शासनाने कोळी बांधवांच्या मागील वर्षातील तसेच आताच्या चक्रीवादळाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेऊन तत्काळ आर्थिक मदत जाहीर करावी, जेणेकरून मच्छीमार पुन्हा उभारी घेऊ शकेल.- लक्ष्मण मेंदाडकर, चेअरमन, एकवीरा मच्छीमार सहकारी संस्था, दिघी
आम्ही उपासमारीशी झुंजतोय, आता कसली वाट पाहताय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2020 11:57 PM