आविष्कार देसाई।अलिबाग : रायगड जिल्ह्यातील परतीच्या पावसामुळे शेतीच्या नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जुलै-आॅगस्ट आणि आॅक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीत पडलेल्या पावसामुळे आतापर्यंत तब्बल सुमारे ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त भातपिकाचे नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे, तर आंब्याची पालवीही कोमजल्याने तब्बल १५ हजार टन निर्यात होणाऱ्या आंब्यालाही आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकरी आणि आंबा बागायतदार असे दोघेही आर्थिक खाईत लोटले जाणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने जिल्ह्याच्या सर्वच भागांमध्ये धुमाकूळ घातला होता. जिल्ह्यातील ९५ हजार हेक्टरवर भाताचे पीक घेतले गेले आहे. मोठ्या संख्येने शेतकरी भाताचेच पीक घेत असल्याने भातपिकाचे चांगलेच उत्पादन येते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भातपिकाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेलेही भात भिजल्यामुले हातातोंडाशी आलेला घासही गेला आहे. पावसाने शेतातील भाताचे पीक आडवे झाल्याने शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.जुलै-आॅगस्ट महिन्यामध्ये पडलेल्या अतिवृष्टीमुळे रायगड जिल्ह्यातील सुमारे १७ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले होते. तसेच आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पडलेल्या परतीच्या पावसामुळे २० हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीचा आकडा हा ३७ हजार हेक्टरवर पोहोचल्याचे दिसते. मात्र, प्रत्यक्षात आॅक्टोबर-नोव्हेंबर या कालावधीतील परतीच्या पावसामुळे ५० हजार हेक्टरपेक्षा अधिक नुकसान झाल्याची भीती राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त के ली.अवेळी पडलेल्या पावसामुळे आंबा बागायतीचेही प्रचंड नुकसान होणार आहे. आंब्याला पालवी फुटतानाच पावसाने तडाखा दिल्याने पालवी कोमजली आहे. आपल्या विभागातून तब्बल १५ हजार टन आंब्याची निर्यात केली जाते. त्यामुळे येथील आंबा बागायतदारांना चांगल्या प्रमाणात परकीय चलन मिळते. मात्र, या वर्षी आंबा उशिरा येणार असल्याने त्याची चव उशिरा चाखायला मिळणार आहे. शिवाय, आंबा निर्यातीवरही विपरित परिणाम होऊन आंबा बागायतदारांसमोर आर्थिक संकट निर्माण होऊ शकते, असेही मोकल यांनी स्पष्ट केले.१७ हजार ५०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे झालेपरतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या क्षेत्राचे पंचनामे करण्याचे आदेश सरकारने संबंधित जिल्हाधिकाºयांना दिले आहेत. त्यानुसार जिल्हा महसूल प्रशासनाने युद्धपातळीवर नुकसानीचे पंचनामे करण्याला सुरुवात केली आहे. सरकारी आकडेवारीनुसार ६ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील २० हजार हेक्टरवरील भाताच्या पिकाचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यापैकी १७ हजार ५०० हेक्टरवरील नुकसानीचे पंचनामे करण्यात आले असल्याचा दावा निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला.आंब्यालाही पावसाचा फटका बसणार - शेळकेजुलै-आॅगस्ट महिन्यात अतिवृष्टीने १७ हजार हेक्टरवरील भाताचे पिकाचे नुकसान झाले होते. त्यानंतर आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांतील परतीच्या पावसामुळे आतापर्यंत २० हजार हेक्टर क्षेत्रावरील भाताचे पीक वाया गेले आहे. पाऊस ठिकठिकाणी सुरूच असल्याने नुकसानीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी पांडुरंग शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आंब्यालाही पावसाचा फटका बसणार असल्याचे शेळके यांनी सांगितले.