अल्पसंख्याक, बहुजनांच्या मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो: खासदार सुनील तटकरे
By राजेश भोस्तेकर | Published: June 14, 2024 06:11 PM2024-06-14T18:11:25+5:302024-06-14T18:12:42+5:30
तरीही विरोधकांचा झाला भ्रमनिरास
राजेश भोस्तेकर, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग : रायगड लोकसभा निवडणूक चुरशीची होईल असे वातावरण निर्माण झाले होते. महायुती पक्षात एकोपा राहणार नाही असाही भ्रम निर्माण केला होता. तसेच संविधान बदलाचा प्रचार, अल्पसंख्यांक, बहुजन समाजाची सहानभुती यामुळे मतांचे ध्रुवीकरण झाले होते. हे रोखण्यात आम्ही कुठेतरी कमी पडलो हे मान्य करतो. मात्र एवढे करूनही रायगडात विरोधकांचा भ्रम नीरस होऊन रायगडाच्या जनतेने आमच्या विकास कामावर विश्वास ठेवून लोकसभेत मोठ्या मताधिक्याने विजय देऊन पाठवला असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी मांडले आहे.
रायगडचे नवनिर्वाचित खासदार यांची निवडून आल्यानंतर पहिलीच पत्रकार परिषद अलिबाग येथे शुक्रवारी १४ जून रोजी राष्ट्रवादी भवनात सुनील तटकरे यांनी घेतली. यावेळी आपल्या यशाबद्दल आणि लोकसभा मतदार संघातील विकासाबाबत आपले मत व्यक्त केले. आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे, अलिबाग मुरुड विधानसभा अध्यक्ष अमित नाईक, तालुकाध्यक्ष जयंत भगत, हर्षल पाटील पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
विकासाच्या दृष्टीने आम्ही लोकसभा जिंकलो. अल्पसंख्याक, बहुजन समाजातील मनातील शंका काढण्यात आम्ही कमी पडलो. त्या काढल्या असत्या तर मताधिक्य वाढले असते. मात्र मिळालेल्या यशाने हुरळून जाणार नाही. आगामी विधानसभा निवडणुका महायुती एकत्रित लढणार आहोत. जिल्ह्यातील सातही मतदार संघात महायुती विजयी होईल. रत्नागिरी जिल्ह्यात पाचही मतदार संघात महायुतीला फटका बसला आहे. त्याठिकाणी आम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार असल्याची स्पष्टता खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
जिल्ह्यातील रखडलेले महामार्ग, सांबरकुंड, उमटे धरण, आर सी एफ कंपनी प्रकल्पग्रस्त प्रश्न, जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय इमारत प्रश्न सोडविण्यासाठी पाहिले प्राधान्य असणार आहे. तसेच जिल्ह्यातील पायाभूत सुविधा, दळणवळण, मच्छीमार प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.