महाडः दिवाळी, गणपती किंवा सगळेच प्रमुख सण आपण तिथीनुसार साजरे करतो. त्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीही तारखेनुसार नव्हे; तर तिथीनुसार साजरी व्हायला हवी, असं मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे.
छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे आपली अस्मिता आहे, आपली ओळख आहे. ते महाराष्ट्राचे आराध्य दैवतच आहेत. खरं तर, त्याची जयंती ३६५ दिवस साजरी करायला हवी, त्यांचं स्मरण रोजच करायला हवं, असंही त्यांनी नमूद केलं.
शिवरायांची जयंती, राज्याभिषेक सोहळा दरवर्षी दोन वेळा साजरा होतो. काही जण तो तिथीनुसार करतात, तर काही जण तारखेनुसार. त्याबाबत राज ठाकरे म्हणाले की, बऱ्याच वर्षांपूर्वी मी जयंत साळगावकरांना भेटलो होतो. शिवाजी महाराजांची जयंती हा केवळ उत्सव नाही, तर तो आपला सण आहे. त्यामुळे तो तिथीनुसार साजरा व्हायला हवा, असं त्यांनी ठामपणे सांगितलं होतं. त्यावर प्रत्येकाने विचार करायला हवा, असं राज म्हणाले.
मनसेच्या नवनिर्माणाचं ध्येय समोर ठेवून राज ठाकरे राज्याचा दौरा करताहेत. त्या दरम्यान, रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये शिवप्रेमींनी त्यांची भेट घेऊन शिवराज्याभिषेक सोहळ्याचं आमंत्रण दिलं. त्यावेळी, महाराजांचे पुतळे उभारण्यापेक्षा त्यांच्या गड-किल्ल्यांचं जतन-संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी नमूद केलं.