सहलींवर निर्बंधास प्रखर विरोध करू
By admin | Published: February 8, 2016 02:45 AM2016-02-08T02:45:01+5:302016-02-08T02:45:01+5:30
मुरु ड -जंजिरा समुद्रकिनारी घडलेली विद्यार्थ्यांची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये
जंजिरा/नांदगाव : मुरु ड -जंजिरा समुद्रकिनारी घडलेली विद्यार्थ्यांची दुर्घटना ही दुर्दैवी आहे. पर्यटकांनी स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नये. कोकणचा समुद्रकिनारा जगभरच्या पर्यटकांचे गोव्यानंतरचे मुख्य आकर्षण आहे. सरकारने सुरक्षेच्या दृष्टीने सकारात्मक पावले उचलण्याची गरज आहे. केवळ मुरु ड-जंजिराच्या दुर्घटनेचा बाऊ करून पर्यटकांना समुद्री सुरक्षा सुविधा न देता सहलींवर निर्बंध घालण्याच्या सरकारच्या निर्णयाला प्रखर विरोध करू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले. रविवारी सुनील तटकरे यांनी ‘त्या’ दुर्दैवी घटनास्थळाची पाहणी केली.
शहराच्या संपूर्ण २.५ कि.मी. समुद्रकिनारपट्टीचा केवळ हा कोपरा धोकादायक आहे. मागील दोन दशकामध्ये तीन मोठे अपघात येथे घडले आहेत. त्याचे कारण पर्यटकांनी अति मद्यप्राशन अथवा ओहोटीच्यावेळी स्थानिकांच्या सूचनांकडे लक्ष न देता अति साहस करणे हेच आहे, असे यावेळी उपस्थित कोळी बांधवांनी सांगितले. या ठिकाणी निरीक्षण मनोरा (वॉच टॉवर) असण्याची गरज असल्याचे समजल्यावर सुनील तटकरे यांनी आमदार निधीमधून १० लाख रु पये या कामासाठी देण्याची घोषणा केली.
पर्यटनाच्या माध्यमातून शेकडो कुटुंबे उदरनिर्वाह करीत आहेत. सरकारने स्थानिक जनतेच्या भावना व सूचना लक्षात घेऊन पर्यटकांसाठी सुरक्षा व्यवस्था करावी, अशी मागणी आ. सुनील तटकरे यांनी केली. या पाहणी दौऱ्याच्या वेळी मंगेश दांडेकर, आतिक खतीब आदींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. (वार्ताहर)