लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पूर्ण चांदा ते बांदा आपल्याला सत्ताबदल करायचा आहे. सत्तेपुढे शहाणपण टिकत नाही, असे म्हणतात. मात्र, शहाणपणाची सत्ता आणायची आहे. सध्या जनतेला मूर्खात काढण्याचा उद्योग सुरू आहे. तो फार काळ चालणार नाही, अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी केली. पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी मातोश्री निवासस्थानी ठाकरे गटात प्रवेश केला तेव्हा ठाकरे यांनी शिंदे गटावर टीका केली. शिशिर धारकर यांना उद्देशून उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्हालाही वाॅशिंग मशीनमध्ये जाऊन स्वच्छ होता आले असते. पण तुम्ही त्यातले नाही. कर नाही त्याला डर कशाला? वॉशिंग मशीनमध्ये जाण्याऐवजी तुम्ही लढवय्यांच्या शिवसेनेत येणे पसंत केले. आता सगळे शिवसैनिक तुमच्या पाठीशी आहेत.
२५० गाड्यांचा ताफा
शिशिर धारकर पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी होते. त्यांच्यावर ५०० कोटींहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. काही वर्षांपूर्वी त्यांचे पेण मतदारसंघावर वर्चस्व हाेते. सध्या हा मतदारसंघ भाजपच्या रवींद्र पाटील यांच्या ताब्यात आहे. २५० गाड्यांचा ताफा घेऊन धारकर शेकडो समर्थकांसह मातोश्रीवर आले.
ठाकरे, राऊत यांचा जामीन मंजूर
खा. राहुल शेवाळे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर शिवसेनेच्या मुखपत्रात प्रसिद्ध झालेल्या कथित बदनामीकारक लेखांशी संबंधित प्रकरणात आपण दोषी नाही, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व खा. संजय राऊत यांनी सोमवारी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने प्रत्येकी १५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर उभयतांचा जामीन मंजूर केला. उद्धव ठाकरे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते.