हवामान आधारित विमा योजनेची मागणी

By admin | Published: May 28, 2017 02:56 AM2017-05-28T02:56:26+5:302017-05-28T02:56:26+5:30

कोकण विभागातील पर्जन्यमान खात्रीचे आणि भरपूर असले तरी ‘अतिवृष्टी’ आणि ‘पावसातील खंड’ या दोन कारणास्तव भात (तांदूळ) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते.

Weather based insurance plan demand | हवामान आधारित विमा योजनेची मागणी

हवामान आधारित विमा योजनेची मागणी

Next

- जयंत धुळप । लोकमत न्यूज नेटवर्क

अलिबाग : कोकण विभागातील पर्जन्यमान खात्रीचे आणि भरपूर असले तरी ‘अतिवृष्टी’ आणि ‘पावसातील खंड’ या दोन कारणास्तव भात (तांदूळ) उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होते. कोकणातील भात उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान थांबविण्याकरिता राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत ‘हवामानावर आधारित पीक विमा योजना’ कोकणात अमलात आणावी, अशी मागणी कोकणातील शेतकऱ्यांची आहे. लोकप्रतिनिधींनी या मागणीचा गांभीर्याने पाठपुरावा करणे आवश्यक आहे.
नैसर्गिक आपत्ती सदरात अवर्षणाचा विचार सरकारकडून करण्यात येतो; परंतु कोकणातील अतिवृष्टी किंवा पर्जन्यखंड यांचा विचार मात्र होत नाही. कोकणातील शेतकरी दरवर्षी पीक विमा योजनेकरिता कोट्यवधी रुपयांचा हप्ता भरतो; परंतु विमा निकषात कोकणातील शेतकऱ्याची नुकसानी बसत नसल्याने त्यास या विमा योजनेचा कोणत्याही प्रकारे लाभ होत नाही.
विद्यमान कृषी विमा योजनेत ७० ते ७५ टक्के नुकसानीचा निकष आहे, तो कोकणाकरिता ९० ते ९५ टक्के करणे अनिवार्य असल्याचे गणित रायगड जिल्ह्यातील जाभिवली येथील प्रयोगशील भात उत्पादक शेतकरी श्रीधर गांगल यांनी मांडले आहे.
कोकणात खरीप हंगामात भात हे एकमेव मुख्य पीक असून, या पिकाखाली ४ लाख ५ हजार हेक्टर क्षेत्र आहे. कोकणातील खरीप भात पिकाकरिता ‘पंतप्रधान पीक विमा योजना’ आणि ‘राष्ट्रीय कृषी विमा योजना’ लागू करण्यात आली होती. कोकण विभागातील खात्रीच्या आणि भरपूर पर्जन्यमानामुळे पिकांची प्रतिहेक्टरी उत्पादकता राज्यातील इतर विभागांपेक्षा अधिक असते. या पिकाचे उंबरठा उत्पादन दरवर्षी जास्त आल्यामुळे मागील पाच वर्षांत कोकण विभागातील एकाही शेतकऱ्यांला पीक विमा योजनेचा लाभ मिळू
शकला नसल्याचे, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण जवळच्या सावर्डे येथील प्रयोगशील शेतकरी
राजाभाऊ राजेशिर्के यांनी यावेळी सांगितले.
कोकणात भाताची सरासरी उत्पादकता मुळातच ८० ते ८५ टक्केपेक्षा अधिक आहे; परंतु अतिवृष्टी वा पर्जन्यखंडामुळे भात उत्पादक शेतकऱ्याचे नुकसान होते. विमा निकष ७० ते ७५ टक्केचा असल्याने त्यात हा शेतकरी बसत नाही. शेतात भात कापणी झाल्यावर ते पावसात भिजून नुकसान होते; परंतु ते पीक विमा योजनेत विचारात घेतले जात नाही आणि शेतकऱ्यास मोठा फटका बसतो, अशी बाजू सिंधुदुर्गमधील कुडाळ येथील अशोक पेडणेकर यांनी मांडली आहे. तर निकषाच्या कारणास्तव शेतकरी योजनेत सहभागी होण्यास उत्सुक नाहीत, अशी माहिती बामणगाव येथील शेतकरी बाळकृष्ण जोशी यांनी दिली आहे.


धोक्याचा कालावधी निश्चित करावा
- सन २०१४ व २०१५च्या खरीप हंगामात राष्ट्रीय कृषी विमा योजनेअंतर्गत ‘हवामान आधारित पीक विमा योजना’ कोकणातील ठाणे, पालघर व रायगड या तीन जिल्ह्यांत राबविण्यात आली होती.
- या योजनेअंतर्गत भात पिकासाठी ‘अपुरा पाऊ स’ , ‘पावसातील खंड’ आणि ‘अतिपाऊस’ या हवामान घटकांपासून विमा संरक्षण देण्यात आले होते. त्या वेळी २६ हजार १५९ शेतकरी सहभागी शेतकऱ्यांना एकूण ५ कोटी ४४ कोटी रुपयांची नुकसानभरपाईही मिळाली होती. त्याच योजनेप्रमाणे हवामान धोक्याची प्रमाणके, हवामान धोके कालावधी निश्चित करणे गरजेचे आहे.
- ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ या मोहिमेअंतर्गत पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतक ऱ्यांनी सहभागी होण्याच्या दृष्टीने पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत हवामानावर आधारित पीक विमा योजना भात पिकासाठी कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना लागू करण्यात यावी, अशी मागणी विविध शेतकरी संघाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, ‘हवामान आधारित पीक विमा योजना’ शासनस्तरावर विचाराधीन असल्याचे सरकारी सूत्रांनी सांगितले.

Web Title: Weather based insurance plan demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.