रायगड जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांना पावसाच्या तडाख्यामुळे बुधवारी सुट्टी!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2023 11:02 PM2023-07-25T23:02:04+5:302023-07-25T23:08:28+5:30
मंगळवारपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावल्याने उद्या 'रेड अलर्ट'
School closed due to heavy rainfall in Raigad जमीर काझी, अलिबाग: रायगड जिल्ह्यात मंगळवार सायंकाळ पासून मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. वेध शाळेने रेड अलर्टचा इशारा दिला असल्याने बुधवारी, दि. २६ जुलै रोजी रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये सुरक्षित स्थळी रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेले आहे.
शासनाने जारी केलेले परिपत्रक जसेच्या तसे-
ज्याअर्थी, उक्त नमुद अ.क्र. ४ अन्वये प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वसूचनेवरून जिल्ह्यातील त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढावा घेवून, संपूर्ण जिल्ह्याकरीता अथवा जिल्ह्यातील ठरावीक स्थानिक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे सक्षम अधिकारी सक्षम प्राधीकारी यांना प्रदान करण्यात आले आहे. ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ मधील कलम २५ अन्वये जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहेत व संदर्भ क. २ कडील शासन परिपत्रकानुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. आणि ज्याअर्थी, रायगड जिल्ह्यामध्ये सद्यस्थितीमध्ये अतिवृष्टी होत असून तसेच भारतीय हवामान खात्याने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार दिनांक २६/०७/२०२३ रोजी रायगड जिल्ह्याला अतिवृष्टीचा (Heavy to very Heavy Rainfall at to places with extremely heavy rainfall at Isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे. या बाबींचा विचार करता, जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळा व महाविद्यालये यांना दि. २६/०७/२०२३ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक असल्याचे माझे मत झाले आहे. त्याअर्थी, मी डॉ. योगेश म्हसे, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, रायगड मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व दिनांक ०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये रायगड जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षक केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक २६/०७/२०२३ रोजी सुट्टी जाहीर करीत आहे.