तळा : तळा शहरात दर बुधवारी भरणाऱ्या आठवडी बाजारामुळे स्थानिक व्यावसायिकांवर परिणाम होत असून, तळा शहरातील आठवडी बाजार बंद करण्याची मागणी बाजारपेठेतील स्थानिक व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे.
दर बुधवारी तळा बसस्थानकाशेजारी भरणाऱ्या आठवडी बाजारात बहुतांश व्यापारी हे बाहेरून येऊन आपली दुकाने बाजारपेठेत थाटतात, त्यामुळे सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात बाहेरून आलेल्या व्यापाऱ्यांमुळे तळा शहरातील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
खेड्यापाड्यातील नागरिक फक्त आठवडी बाजारालाच येत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणावर ग्राहकांची गर्दी उसळते. यामुळे एखादा कोरोनाबाधित रुग्ण संपर्कात आल्यास प्रादुर्भाव झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे, तसेच बुधवारी नागरिक आठवडाभराची खरेदी करीत असल्याने बाकी सहा दिवस बाजारपेठेत शुकशुकाट असतो. परिणामी स्थानिक व्यापारावर याचा परिणाम होतो. त्यामुळे दर बुधवारी भरणारा आठवडी बाजार बंद करण्याची मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे, तर दुसरी बाजू लक्षात घेता नागरिकांना दैनंदिन जीवनात लागणारा माल दुकानांपेक्षा आठवडा बाजारात कमी दरात मिळतो, त्यामुळे ग्राहकांना भावात तफावत जाणवत असल्याने नाइलाजाने त्यांना बाजारात माल खरेदी करावा लागत आहे. स्थानिक व्यापाऱ्यांनी जर आपल्या मालाचे भाव स्थिर ठेवले तर ग्राहक आठवडी बाजाराकडे वळणारच नाहीत असे मत जाणकारांकडून व्यक्त केले जात आहे.