रायगडमध्ये आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या अर्थचक्राला गती, १३३ वर्षांची परंपरा टिकून

By निखिल म्हात्रे | Published: January 8, 2023 06:26 PM2023-01-08T18:26:20+5:302023-01-08T18:26:56+5:30

आठवडा बाजार संस्कृतीने स्थानिक व्यापाऱ्यांची अर्थचक्र सुधारले असून, दिवसाला लाखो रुपयांची उलढाल या आठवडा बाजारातून होत आहे.

Weekly market in Raigad accelerates economic cycle of local traders, sustains 133 years of tradition | रायगडमध्ये आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या अर्थचक्राला गती, १३३ वर्षांची परंपरा टिकून

रायगडमध्ये आठवडा बाजारामुळे स्थानिक व्यापाऱ्यांच्या अर्थचक्राला गती, १३३ वर्षांची परंपरा टिकून

Next

अलिबाग - मॉल व साखळी दुकाने संस्कृतीमुळे आठवडा बाजारांवर परिणाम झाल्याचे बोलले जात असले तरी रायगड जिल्ह्यातील आठवडा बाजार आजही दिमाखात भरत आहेत. विशेष म्हणजे शहरात राहणाऱ्यांनामध्येही या बाजाराची ओढ आजही दिसून येत आहे. मॉलमध्ये नाही मिळत, पण आठवडा बाजारात मिळते, अशा भावना आजही शहरवासीय व्यक्त करीत आहेत.

रायगड जिल्ह्यातील आठवडा बाजारांना १३३ वर्षांची परंपरा आहे. मॉल संस्कृतीमुळे काही बाजार बंद पडले असले तरी नव्याने सुरूही होत आहेत. आठवडा बाजार संस्कृतीने स्थानिक व्यापाऱ्यांची अर्थचक्र सुधारले असून, दिवसाला लाखो रुपयांची उलढाल या आठवडा बाजारातून होत आहे.

आठवडा बाजारांमध्ये मॅलच्या दरापेक्षाही कमी दरात मिळणारे कपडे, कडधान्य, याशिवाय कांदे, बटाटे, घरगुती पद्धतीचे मसाले, पापड, लोणची, प्लॅस्टिकची भांडी यासह आठवडा बाजारात असलेल्या अनेक वस्तू खरेदी करण्यासाठी ग्रामीण भागासह शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करीत असतात.

१३३ वर्षांची परंपरा

१३३ वर्षांची आठवडा बाजारांना परंपरा आहे. १८८३ मध्ये अलिबाग तालुक्यात अलिबाग, वदंडा, किहीम, पोयनाड, रामराज, आंबेपूर आणि नागाव, पेण तालुक्यात पेण व नागोठणे, माणगाव तालुक्यात माणगाव व निजामपूर, रोहा तालुक्यात रोहा व अष्टमी आणि महाड तालुक्यात महाडला आठवडा बाजार भरण्यास प्रारंभ झाला. तत्कालीन मुरुड-जंजिरा संस्थानातील म्हसळा व श्रीवर्धनला आठवडे बाजार भरत असे. १८८२ मध्ये तत्कालीन ठाणे जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात गौळवाडी, कोंदिवडे, दहिवली, कडाव, नेरळ, कदंब, सुगवे, खालापूर व तुपगाव या नऊ ठिकाणी मोठा आठवडा बाजार भरत असे.

पोयनाड मोठी बाजारपेठ

अलिबाग तालुक्यातील पोयनाड ही एक मोठी दैनिक बाजारपेठ आजही सुप्रसिद्ध आहे. त्याचबरोबर येथे दर सोमवारी मोठा आठवडा बाजारही भरतो. सरकारी दप्तर नोंदीनुसार प्रारंभीच्या काळात पोयनाड बाजारात २०० विक्रेते आणि १ हजार खरेदीदार येत असत, तर हटाळे - नागावच्या आठवडे बाजारात प्रांरभीच्या काळात १५ विक्रेते व आता १००० खरेदीदार येत असत. वायशेत येथील आठवडा बाजारात नित्याने स्थानिकांसह पर्यटकही हजेरी लावतात.

खरेदीची मौज

जिल्ह्यात भरणाऱ्या आठवडा बाजारांपैकी अनेक बाजार हे पर्यटनस्थळाच्या ठिकाणी आहेत. तर अनेक बाजार सागरीकिनाऱ्यांकडे जाणाऱ्या मार्गावर असल्याने येथे पर्यटक आवर्जून थांबतात. मॉलच्या तुलनेत आठवडे बाजारात घासाघीस करून माल खरेदी करण्याची मजा काही ओरच असल्याचे पिंपरी-चिंचवड येथून आलेले आणि हाटाळे-नागावच्या आठवडे बाजारात खरेदी करणारे उदय पारसनीस यांनी सांगितले.

मातीशी नाते

मॉलमध्ये जे मिळत नाही ते या आठवडा बाजारात मिळते. मातीशी नेमके नाते सांगणारा हा बाजार गावाच्या वातावरणाचा आनंद देतो, अशी प्रतिक्रिया मूळच्या अलिबागच्या असल्या तरी सध्या वरळी येथे वास्तव्यास असणाऱ्या साक्षी राणे यांनी दिली.

शेतकऱ्यांना चार पैसै मिळाल्याचा आनंद

शेतकऱ्याच्या हातून तांदूळ, नारळ, वाल, चणे आदी जीवनोपयोगी वस्तू थेट विकत घेताना आनंद आणि समाधान मिळते. शिवाय दलालांऐवजी मेहनत करणाऱ्या शेतकऱ्यांना त्याचा जास्त मोबदला मिळत असल्याने दोन पैसे जास्त देण्याची तयारीही यावेळी असल्याचे अंधेरी येथे राहणाऱ्या लीना जाधव यांनी सांगितले.
 

Web Title: Weekly market in Raigad accelerates economic cycle of local traders, sustains 133 years of tradition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड