नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाऱ्या पाच वीरांचे स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2020 11:09 PM2020-02-26T23:09:19+5:302020-02-26T23:09:26+5:30
महाडमध्ये सत्कार; १०१ दिवसांत पूर्ण केली ३२०० किमीची परिक्रमा
महाड : नर्मदा परिक्रमा पूर्ण करणाºया महाडमधील पाच वीरांचे मंगळवारी महाडमध्ये जोरदार स्वागत करण्यात आले.
वयाची साठी पूर्ण केलेल्या आणि शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सुधीर गोगटे, दिलीप बागडे, भगवान केळकर, माधव गाडगीळ आणि रमेश बडे या पाच वीरांनी ही नर्मदा परिक्रमा १०१ दिवसांत ३२०० किमी अंतर पार करून पूर्ण केली. मंगळवारी सायंकाळी त्यांचे महाड शहरात आगमन होताच फटाके वाजवून त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. श्रीराम मंदिर ब्राम्हण समाजाच्या वतीने या पाच परिक्रमा करणाऱ्यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ कीर्तनकार मिलिंद बुवा बडवे, संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास भाटे, शरद गांगल, श्रीकृष्ण बाळ, रामभाऊ आंबेकर, सुधीर शेठ आदी उपस्थित होते. सुधीर गोगटे यांनी या परिक्रमेदरम्यान आलेले अनुभव कथन केले. या परिक्रमेच्या वेळी आपल्याला प्रत्येक दिवशी प्रेम, मानवतावादी आणि आपुलकीचे दर्शन झाले, म्हणूनच ही परिक्रमा यशस्वीपणे पार पडली असल्याचे सुधीर गोगटे यांनी या वेळी सांगितले. श्रीनिवास भाटे यांनी प्रास्तविक केले. या वेळी रामभाऊ आंबेकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाला शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी जोशी यांनी केले.
तरुणांनी प्रेरणा घ्यावी -मिलिंद बडवे
महाडमधील पाच वीरांनी पूर्ण केलेली खडतर अशी नर्मदा परिक्रमा तरुणांना प्रेरणादायी असून, या पाचापासून तरुणांनी प्रेरणा घेऊन पुढील वर्षी २५ महाडकरांनीही परिक्रमा पूर्ण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मिलिंद बडवे यांनी केले.