अवयवदान जनजागृती पदयात्रेचे महाडमध्ये स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 03:04 AM2018-03-14T03:04:25+5:302018-03-14T03:04:25+5:30
अवयवदानाबाबत समाजात मोठे गैरसमज आहेत. यामुळे अवयवदानाच्या चळवळीत अडचणी येत असतात.
महाड : अवयवदानाबाबत समाजात मोठे गैरसमज आहेत. यामुळे अवयवदानाच्या चळवळीत अडचणी येत असतात. ही चळवळ अधिक व्यापक करण्यासाठी व या विषयी समाजात जनजागृती करण्यासाठी नाशिकचे ६८ वर्षीय सुनील देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या मुंबई ते गोवा पायी वारीचे महाड येथे स्वागत करण्यात आले.
महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी यासाठी पुढाकार घेऊन या वारीत सहभागी झालेल्यांना नगरपरिषदेच्या सभागृहात निमंत्रित
करून त्यांचा सत्कार केला व अवयवदानाच्या चळवळीविषयी या सर्वांकडून माहितीही घेतली. यावेळी उपनगराध्यक्षा सुषमा यादव, बांधकाम सभापती विजय कोंडिवर तसेच नगरसेवक, कर्मचारी उपस्थित होते. यंदा कोकणमार्गे मुंबई-गोवा अशी तब्बल ८२६ किलोमीटरची पायी वारी ५२ दिवसांत केली जाणार आहे. यासाठी दररोज वीस किमी पायी प्रवास यातील वारकरी करत आहेत. वाटेत प्रत्येक मुक्कामी अवयवदान व देहदानाविषयी प्रबोधनपर व्याख्याने व जागृतीही करण्यात येत आहेत. सुनील देशपांडे यांच्यासह पुरु षोत्तम पवार, चंद्रशेखर देशपांडे, शैलेश देशपांडे, प्रियदर्शन बापट, शरद दाउतखानी, नारायण म्हसकर, रणजीत उंदरे व प्रमोद पवार हे या वारीत सहभागी झाले आहेत, यांचा सत्कार स्नेहल जगताप यांच्या हस्ते करण्यात आला.
अपघातांचे वाढते प्रमाण व त्यामुळे निकामी होणारे अवयव यामुळे अनेकांना अवयवांची गरज भासते. याकरिता अवयवदानाबाबत जनजागृती होण्याची नितांत गरज आहे. गाव-खेड्यांत त्याची जास्त आवश्यकता असल्याने ही वारी करत असल्याचे सुनील देशपांडे यांनी सांगितले तर पुरु षोत्तम पवार यांनी अवयवदान त्यांची गरज व प्रत्यक्ष
प्रक्रियेबाबत माहिती दिली. अवयवदानात राज्याला पहिले स्थान व देशाला महासत्ताक बनवण्यासाठी सर्वांनी या चळवळीत आपले योगदान देण्याचे त्यांनी आवाहन केले. या वेळी कार्यालयीन अधीक्षक सुधीर म्हात्रे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी उपस्थितांनी विचारलेल्या शंकांचेही निरसन करण्यात आले.
>पोलादपूरमध्ये पोलिसांकडून स्वागत
पोलादपूर : महाराष्ट्र देहदान अवयवदान महासंघामार्फत काढण्यात आलेल्या पदयात्रेचे स्वागत पोलादपूरमध्ये करण्यात आले. मरणोत्तर देहदान व अवयवदानाचे महत्त्व व त्याची उपयुक्तता सर्वसामान्य लोकांना समजावी या हेतूने काढण्यात आलेल्या पदयात्रेचे स्वागत करण्यात आल्याची माहिती अवयवदान वारीचे संयोजक सुनील देशपांडे यांनी पोलादपूर येथे दिली.
मुख्य संयोजक म्हणून पुरु षोत्तम पवार वसई हे महासंघाचे संस्थापक म्हणून या पदयात्रेचे नेतृत्व करीत आहेत. सध्या त्यांच्याबरोबर पुढील पदयात्री चालत आहेत. महाराष्ट्र देहदान अवयवदान महासंघाचे सचिव सुधीर बागाईतकर, खजिनदार मीरा सुरेश हे पदयात्री नसले तरी ते पदयात्रेची संपूर्ण आखणी व नियोजन करीत आहेत. पदयात्रेदरम्यान ठिकठिकाणी त्यांनी अवयवदानाची माहिती व उपयुक्तता सांगितली. पोलादपूरमध्ये त्यांचे स्वागत पोलादपूर पोलीस कर्मचारी वृंद, पोलादपूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. संजय शेठ, डॉ. राजेश शिंदे, डॉ. नितीन मपारा, डॉ. समीर साळुंखे यांनी केले.