नववर्षाचे स्वागत जल्लोषात; पर्यटकांसह स्थानिकांनी रस्त्यावर केली गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2019 01:00 AM2019-01-01T01:00:22+5:302019-01-01T01:02:13+5:30
थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने अलिबाग समुद्रकिनारी गर्दी केली होती. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
अलिबाग : थर्टीफर्स्टचे सेलिब्रेशन करण्यासाठी पर्यटकांनी मोठ्या संख्येने अलिबाग समुद्रकिनारी गर्दी केली होती. सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. न्यू इअर पार्टीचे सेलिब्रेशन ठिकठिकाणी पहाटेपर्यंत जल्लोषात सुरू होते.
पर्यटकांनी अलिबाग शहरातील रस्ते गजबजून गेले होते. हॉटेल, रेस्टारंट, लॉजिंग पर्यटकांनी फुलून गेले होते. मद्यविक्रीच्या दुकांनामध्ये तळीरामांनी गर्दी केली होती.
अलिबाग, वरसोली, नागाव, आक्षी, किहीम, काशीद, मुरुड, श्रीवर्धनचे समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. घोडेसवारी, घोडागाडी, उंटाची सफर, स्पीड बोटीचा थरार, बोटीतून किल्ला दर्शन, एटीव्हीची राइड अशा मनोरंजनांच्या साधनांचा आनंद पर्यटकांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला लुटला.
समुद्रकिनारी भेळपुरी, पाणीपुरी, पावभाजी, वडापाव, मसाला डोसा, सॅण्डविच, फ्रँकरोल अशा विविध स्टॉल्सवर खवय्यांनी गर्दी केली होती. विविध हॉटेल, रेस्टारंटमध्ये थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी विशेष पार्ट्यांचे आयोजन केले होते. संगीताच्या तालावर नाचत आणि मद्याचे पेले रिचवच तरुणाईसह वयोवृद्धांनीही सेलिब्रेशनची चांगलीच धूम अनुभवली. काही पार्ट्या पहाटेपर्यंत रंगल्या होत्या.
रात्री उशिरा अलिबागच्या समुद्रकिनारी स्थानिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने जमले होते. १२ वाजून १ मिनिटांनी सरत्या वर्षाला निरोप देत नववर्षाचे सर्वांनी जल्लोषात स्वागत केले. त्या वेळी फटाक्यांच्या आतशबाजीने समुद्रकिनारा उजळून निघाला. एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या, तर काहींचे मोबाइल खणखणत होते. कुटुंबापासून दूर असणाऱ्यांनी आपापल्या नातेवाइकांना मोबाइलवरून शुभेच्छा दिल्या.
- मद्यपान करून वाहन चालवणाºयांमुळे अपघाताच्या घटना घडतात, यामुळे अशांवर ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या कारवाई करून थेट तुरुंगात टाकण्याचा पवित्रा नवी मुंबई पोलिसांनी घेतला आहे. गतवर्षी थर्टीफर्स्टला ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या ५८८ कारवाया झाल्या होत्या. यंदाही मोठ्या प्रमाणात कारवाईच्या उद्देशाने संपूर्ण पोलीस आयुक्तालयात दोन्ही परिमंडळचे पोलीस व वाहतूक पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता, त्याकरिता सर्वाधिक बार असलेल्या सीबीडी, वाशी, एपीएमसी विभागांसह इतरही ठिकाणी पोलीस दबा धरून होते; परंतु कारवाईच्या भीतीने अनेकांनी मद्यपानाच्या पार्ट्यांकडे पाठ फिरवल्याने रात्री उशिरापर्यंत बार व हॉटेलमालक ग्राहकांच्या प्रतीक्षेत होते.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांची हजेरी
रेवदंडा : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी गुलाबी थंडीत पर्यटकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे.
मात्र, आठवड्याचा पहिला कामकाजाचा दिवस असल्याने स्थानिकांचा उत्साह मात्र कमी होता. विविध व्यावसायिकांनी पर्यटकांच्या स्वागताची जय्यत तयारी ठेवलेली दिसत आहे.
कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज दिसत आहेत. काही उपाहारगृहात विशेष मेनू ठेवण्यात आले असले तरी गतवर्षीपेक्षा पर्यटकांची संख्या घडलेली दिसत आहे.