पेणमध्ये शिवज्योतीचे जल्लोषात स्वागत
By Admin | Published: June 8, 2015 04:22 AM2015-06-08T04:22:44+5:302015-06-08T04:22:44+5:30
शेकापतर्फे रायगडावर छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन शेकाप आमदार धैर्यशील पाटील व ५०० कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
पेण : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याप्रसंगी शेतकरी कामगार पक्षातर्फे रायगडावर छत्रपती शिवरायांना विनम्र अभिवादन शेकाप आमदार धैर्यशील पाटील व ५०० कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कोल्हापूर संस्थानचे युवराज शंभूराजे यांच्या हस्ते प्रज्वलित केलेली शिवज्योत मशाल थेट रायगडावरून पेण येथे २०५ किमीचा पायी प्रवास करीत या शिवज्योत पदभ्रमण यात्रेचे पेण शहरात जंगी स्वागत करण्यात आले. याप्रसंगी शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील यांनी उपस्थित राहून शिवज्योतीचे पेण शिवाजी चौकात सांगता केली.
शेतकरी कामगार पक्षातर्फे पहिल्यांदाच हा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. छत्रपतींना साऱ्या समाजाकडून मानवंदना देण्यात येते. यावर्षी शेकाप महिला संचालित मैत्रेय ग्रुपने शिवजयंती साजरी करून नवी संकल्पना राबविली होती. त्यापाठोपाठ पेणचे आमदार धैर्यशील पाटील यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून ही शिवज्योत प्रेरणा रॅलीचा कार्यक्रम राबवून पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरणनिर्मिती केली. थेट रायगड ते पेण या प्रवासात महाड, माणगाव, इंदापूर, कोलाडनाका, वाकणफाटा, नागोठणा, वडखळ या ठिकाणी पक्ष कार्यकर्ते व नेतेगणांनी त्या-त्या ठिकाणी शिवज्योतीचे उत्साहात स्वागत केले. पेण शहरात रायगड बाजार ते शिवाजी चौक या ५०० मीटर अंतरावर शेकापच्या पेण तालुका व शहरातील तब्बल २००० कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढीत या शिवज्योतीचे स्वागत केले. या मिरवणुकीत आमदार जयंत पाटील, माजी आमदार विवेक पाटील, आरडीसीसी बँकेचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, शेकाप रोहा चिटणीस राजा सानप आदींनी सहभाग घेतला. पेणच्या शिवाजी चौकातील शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळ्याजवळ या शिवज्योत यात्रेची सांगता शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील व माजी आमदार विवेक पाटील यांनी केली. (वार्ताहर)