#Welcome2018: जिल्ह्यात १० लाख पर्यटक होणार दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2017 02:40 AM2017-12-30T02:40:37+5:302017-12-31T07:55:27+5:30
ख्रिसमसला किनारपट्टीत आलेल्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत आणि जल्लोषाकरिता किमान दहा लाख पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
अलिबाग : नववर्ष स्वागताकरिता जिल्ह्यात येणा-या पर्यटकांच्या सुरक्षिततेकरिता तसेच वाहतूक कोंडीत त्यांना अडकून राहावे लागू नये, याकरिता जिल्ह्यातून जाणा-या गोवा राष्ट्रीय महामार्गासह राज्य व जिल्हा मार्गावर जिल्हाधिकारी डॉ. अनिल विजय सूर्यवंशी यांनी दिलेल्या आदेशान्वये अवजड वाहनांच्या वाहतुकीवर निर्बंध लागू झाल्याने, स्वत:च्या चारचाकी वाहनातून रायगडच्या सागरपट्टीत येणा-या पर्यटकांच्या संख्येत विक्रमी वाढ होण्याची शक्यता किनारपट्टीतील हॉटेल आणि रिसॉर्ट व्यावसायिकांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे. ख्रिसमसला किनारपट्टीत आलेल्या पर्यटक संख्येच्या पार्श्वभूमीवर नववर्ष स्वागत आणि जल्लोषाकरिता किमान दहा लाख पर्यटक येणे अपेक्षित असल्याचे त्यांनी पुढे सांगितले.
संभाव्य दहा लाख पर्यटकांच्या पार्श्वभूमीवर पर्यटक व स्थानिक नागरिक यांच्या सुरक्षेसाठी तसेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्याकरिता रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांच्या नियोजनानुसार जिल्ह्यात चोख सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील सर्व पोलीसठाण्यांच्या हद्दीत विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून, जिल्ह्यातील नियमित पोलीस बळाव्यतिरिक्त अतिरिक्त ३०० पोलिसांची नियुक्ती बंदोबस्ताकरिता करण्यात आली आहे.
विशेषत: मुंबई-गोवा महामार्ग, अलिबागसह किनारी भागातील मार्गावर वाहतुकीसाठी विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जिल्ह्यात एकूण १३ ठिकाणी चेकपोस्टवर बंदोबस्त नेमण्यात आला असून वेळोवेळी वाहनांची तपासणी व नाकाबंदी करण्यात येणार आहे.
गर्दीच्या ठिकाणी व अलिबाग, नागाव, मुरु ड, दिघी सागरी पो.स्टे.च्या हद्दीत समुद्रकिनारी व गर्दीच्या ठिकाणी बिट मार्शल व दामिनी पथकाची विशेष पेट्रोलिंग नेमण्यात आली आहे. याशिवाय विविध संवेदनशील ठिकाणी फिक्स पॉइंट, तसेच नियंत्रण कक्ष पी.सी.आर. मोबाइल पेट्रोलिंग ठेवण्यात आली आहे.
सागरी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून दोन बोटी समुद्रामध्ये पेट्रोलिंगसाठी ठेवण्यात आल्या असून, सागरी गस्ती प्रभावी करण्यात आल्या आहेत. ३१ डिसेंबर रोजी मद्य पिऊन वाहन चालवणाºया तळीरामांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असून, ठिकठिकाणी बे्रथ अॅनालायझरचा वापर करण्यात येणार आहे. सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करून धिंगाणा घालणाºयांवर कठोर कारवाईचे आदेश सर्व पोलीसठाण्यांना देण्यात आले आहेत. पर्यटकांनी ३१ डिसेंबर रोजी आपल्यामुळे दुसºयाला त्रास होणार नाही याची खबरदारी घेऊन, सुरक्षितपणे नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करावे, असे आवाहन रायगड पोलीस दलातर्फे करण्यात आले आहे.
>रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे
पर्यटकांनी गजबजले
बोर्ली मांडला : सलग जोडून आलेल्या सुट्ट्या, सरत्या वर्षाला निरोप व नववर्षाच्या स्वागतासाठी मुरु डमध्ये पर्यटकांनी प्रचंड गर्दी केली आहे. तालुक्यातील सर्व समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले आहेत. अलिबाग आणि मुरु ड तालुक्यातील वरसोली, किहीम, नागाव, काशिद, बारशिव, बोर्ली, नांदगाव, मुरु ड आदी ठिकाणच्या समुद्रकिनारी असलेल्या हॉटेल्समध्ये बुकिंग फुल्ल झाली आहेत. येथे बीच फेस्टिव्हल व मुरु डच्या पर्यटनस्थळांना समुद्रकिनारी भेट देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. या वर्षी ‘थर्टी फर्स्ट’चा दिवस रविवार असल्याने या दिवसाचा पुरेपूर आनंद लुटला जाणार आहे. थर्टी फर्स्टची होणारी गर्दी पाहता हॉटेल व घरगुती जेवण बनविणाºयांना अगोदरच आॅर्डर देण्यात आली आहे. नववर्षाचा आनंद लुटण्यासाठी बच्चे कंपनीही तयारीला लागली आहे.
रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून मुरु ड तालुक्यातील मुरु ड-आगरदांडापर्यंत पसरलेल्या किनारपट्टीवरील अनेक गावांमधून डोंगरउतारावर अनेक पर्यटनस्थळे विकसित झाली आहेत. आॅनलाइन बुकिंग सुविधा उपलब्ध असल्याने या वेळी मुंबई, पुण्यातील अनेक पर्यटकांनी या सुविधेचा पुरेपूर लाभ घेतला आहे. यामुळे काशिद हे पर्यटकांचे पसंतीचे ठिकाण बनले आहे.