अलिबाग - मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत आणि १३ टक्के शिक्षणात आरक्षण देण्याबाबत उच्च न्यायालयाने सकारात्मक निर्णय दिला आहे. राज्य सरकारने आपल्या अधिकाराचा वापर करत मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण दिले होते, मात्र न्यायालयाने ते नाकारले. मागासवर्गीय आयोगाने दिलेल्या शिफारशी ग्राह्य धरत न्यायालयाने निर्णय दिल्याने मराठा समाजाने राज्यभर काढलेल्या महामोर्चांना अखेर यश आल्याचे बोलले जाते. न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे, तर राज्य सरकारचे देखील आभार मानण्यात येत आहेत.सकल मराठा समाजाने गेली तीन वर्षे शांततेच्या मार्गाने मोर्चे काढले होते. त्यांचा हा विजय आहे. आघाडी सरकारच्या कालावधीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सुरुवात झाली होती. त्याला आताच्या सरकारच्या कालावधीत न्यायालयाच्या निर्णयाने मूर्तरूप आले आहे. राज्य सरकारने आता न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी ही अपेक्षा.- सुनील तटकरे, खासदार, रायगडराज्य सरकारने दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाला पाठिंबा मिळवला होता. मागासवर्गीय आयोगाच्या शिफारशी उच्च न्यायालयाने मान्य केल्याने बऱ्याच वर्षांपासूनच प्रश्न निकाली निघाला आहे. मराठा समाजाला आता नोकरी आणि शिक्षणात संधी मिळतील.- सुभाष पाटील, आमदार, अलिबागमराठा समाजाच्या मोर्चांना अखेर यश आले. सरकारने सुरुवातीपासून सकारात्मकता दाखवली होती. त्याला सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पाठिंबा दिला होता. आता न्यायालयाचाही निर्णय आला आहे. त्यामुळे खूपच आनंद होत आहे. सर्वांचेच खूप खूप आभार.- भरत गोगावले, आमदार, महाडमराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत न्यायालयाने निर्णय दिल्याने हा मराठा समाजाचा विजय आहे. त्यांनी केलेल्या परिश्रमाचे फळ मिळाले आहे. राज्य सरकार याबाबत नेहमीच मराठा समाजाच्या पाठीशी उभे होते. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षणामुळे मराठा समाजाला न्याय मिळेल. सर्वच राजकीय पक्षांतील नेत्यांचे आभार.- अॅड. महेश मोहिते, भाजप युवा मोर्चा अध्यक्ष, रायगडबºयाच कालावधीपासूनची मागणी होती. ती आजच्या न्यायालयाच्या निकालामुळे पूर्ण झाली आहे. या क्रांतिकारी निर्णयामुळे समाजाला खरा न्याय मिळाला आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्यांना याचा नक्कीच फायदा होईल. न्यायालयाने सहानुभूतीपूर्वक विचार केला तसेच सरकारही पाठीशी खंबीरपणे उभे राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार.- रघुजी आंग्रे, रायगड प्राधिकरण, सदस्यन्यायालयाच्या निर्णयाने मराठा समाजाला न्याय मिळाला आहे. हा ऐतिहासिक निर्णय आहे. या निर्णयामुळे मराठा समाजाला निश्चितच दिशा मिळेल. नोकरी आणि शिक्षणातील आरक्षणामुळे समाजातील युवक मागे राहणार नाहीत. हा खरेच आनंदाचा क्षण आहे. सर्वांचेच आभार.- अरविंद पाशिलकर, भारतीय मराठा महासंघ, रायगड
मराठा आरक्षणातील न्यायालयाच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 2:16 AM