जिल्ह्यात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

By admin | Published: March 29, 2017 05:15 AM2017-03-29T05:15:38+5:302017-03-29T05:15:38+5:30

मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वागत यात्रा काढण्यात आल्या. पारंपरिक पोषाख

Welcoming the celebration of Marathi New Year in the District | जिल्ह्यात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

जिल्ह्यात मराठी नववर्षाचे जल्लोषात स्वागत

Next

अलिबाग : मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी मंगळवारी जिल्ह्यात विविध ठिकाणी स्वागत यात्रा काढण्यात आल्या. पारंपरिक पोषाख परिधान करून ढोल-ताशा आणि झांज पथकांच्या गजरात नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. उत्साहपूर्ण वातावरणात आबालवृध्द मंत्रमुग्ध झाले होते. स्वागत यात्रांमध्ये विविध धर्माच्या नागरिकांनी सहभाग घेतला होता.
चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजे मराठी नववर्षाचा पहिला दिवस. या दिवशी घराघरात गुढी उभारून नववर्षाचे स्वागत करण्यात आले. अलिबाग शहरातील ब्राह्मण आळी येथील श्रीराम मंदिरापासून स्वागत यात्रेला सकाळी साडेसात वाजता प्रारंभ झाला. सुरुवातीला मंदिर परिसरात ज्येष्ठ नागरिक विश्वनाथ शिंदे, अ‍ॅड. एन.के. जोशी यांनी सपत्नीक गुढीची विधिवत पूजा केली. शहरातील प्रमुख रस्त्यांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर नववर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. चौका-चौकांमध्ये गुढ्या उभारण्यात आल्या होत्या. आबालवृध्दांसह विशेष करून महिला मोठ्या संख्येने स्वागत यात्रेत सहभागी झाल्या होत्या. महिलांचे ढोल-ताशा पथक सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते.
सरखेल कान्होजी राजे यांचे वंशज रघुजी आंग्रे हे घोड्यावर स्वार होऊन स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. स्वागत यात्रेमध्ये विविध संस्था, मंडळे, ऐतिहासिक पेहरावातील घोडेस्वार, घोडागाड्या, मलखांब पथके, विविध बॅण्ड पथके हे स्वागत यात्रेचे वैशिष्ट्य होते. शिवाजी पुतळा येथील काशी विश्वेश्वर मंदिराजवळ स्वागत यात्रेची सांगता झाली.
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त असणाऱ्या पाडव्याच्या दिवशी सोने खरेदीची धूम पाहायला मिळाली. वाहन खरेदीसाठी गर्दी झाली होती.

उरणमध्ये नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा
उरणमध्ये गुढीपाडवा सणाचे औचित्य साधून आणि मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रेचे आयोजन के ले होते.
चित्ररथातून काढण्यात आलेल्या शोभायात्रेच्या मिरवणुकीत आमदार मनोहर भोईर, सायली म्हात्रे, सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर, उनप सेनेचे गटनेते गणेश शिंदे, नगरसेवक, नगरसेविका, समाजसेवक संतोष पवार, काशिनाथ गायकवाड, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य, विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, विद्यार्थी, नागरिक सहभागी होते.
पेन्शनर पार्कवरून निघालेल्या चित्ररथ आणि मिरवणुकीची उनप प्राथमिक शाळेच्या प्रांगणात सांगता झाली.

रेवदंडा येथे गुढीपाडवा उत्साहात

रेवदंडा : येथे गुढीपाडवा उत्साहात साजरा झाला. सकाळी वाडी, वस्त्या, इमारती आदी ठिकाणी घरोघरी गुढी उभारण्यात आली. मिठाईच्या दुकानात नागरिक गोडधोड पदार्थ खरेदीसाठी गर्दी
के लीहोते. फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर दिसत होती. मोबाइल गॅलरी, रेडिमेड कपड्यांची दुकाने, फर्निचर दुकाने, सोने-चांदीची पेढी आदी ठिकाणी नववर्षाची खरेदी करण्यासाठी नागरिक दिसत होते. रामेश्वर मंदिर चौल ते रेवदंडा शोभायात्रा काढण्यात आली. चौल, नागाव व रेवदंडा विभागातील भारतीय जनता पक्षातर्र्फे चौल रामेश्वर मंदिराच्या प्रांगणात पंचम निषाद ही मराठी, हिंदी गाण्यांची मैफल आयोजित केली होती. या वेळी श्रोते मंत्रमुग्ध झाले.


ढोल-ताशांचा गजर
रसायनी : मोहोपाड्यात गुढीपाडव्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून शिवराय ढोल-ताशा ध्वज पथकातील रसायनी परिसरातील तरुण व तरुणींनी ढोल-ताशा वादनाने सर्वांचे लक्ष वेधले. तरुणांनी भगवे फेटे, सफेद कुडता, पायजमा आणि तरुणींनी नऊवारी साडी, नथ व फेटा असा पोशाख परिधान केले होते. ही शोभायात्रा पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.


स्त्री अस्मितेची गुढी
अलिबाग : हिंदू नववर्षाच्या स्वागताकरिता सर्वत्र ढोल-ताशांच्या गजरात स्वागत होत असताना पेणमध्ये महिला अत्याचार विरोधी मंचाच्या माध्यातून स्त्री अस्मितेची गुढी उभारण्यात आली. कुप्रसिध्द निर्भया प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या वैशाली पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन झालेल्या या मंचाच्या माध्यमातून नेहमीच आगळे-वेगळे उपक्रम केले जातात. संक्रांतीच्या महिला पतंगोत्सवानंतर नववर्षाचे स्वागतही मंचामार्फत वैशिष्ट्यपूर्ण पध्दतीने गेल्या पाच वर्षांपासून करण्यात येत आहे.
पुरोगामी महाराष्ट्र राज्य हे शाहू छत्रपती, महात्मा फुले, डॉ. आंबेडकरांचा वसा सांगतो. त्याला अनुसरूनच मंगळवारी ‘वंचित समाजातील महिलांच्या अस्मितेची’ ही गुढी उभारण्यात आली.
आदिवासी मुला-मुलींनी ढोल-ताशांच्या व पारंपरिक नृत्याचा ठेका घेत सुरू झालेल्या मिरवणुकीत समाजातील विधवा, परितक्ता, गतिमंद, अल्पसंख्याक, अनाथ मुली आणि महिलांनी सहभाग घेतला. यामध्ये अंकुर ट्रस्टचे आदिवासी विद्यार्थी, आई डे केअरचे गतिमंद मुले, चाईल्ड हेवनची निराश्रित मुले, वाघाई घरकामगार संघटनेच्या एकल महिला या मोठ्या उत्साहात व आनंदाने सहभागी झाल्या होत्या. ‘हम भारत की नारी है। फुल नही चिंगारी है।’ अशा प्रकारचे फलक हाती घेवून,घोषणा देत रायगड बाजार पेण येथून सुरू झालेल्या मिरवणुकीची सांगता म.गांधी मंदिर, पेण येथे करण्यात आली.

महाडमध्ये शोभायात्रा

महाड : महाड औद्योगिक क्षेत्रात महाड उत्पादक संघटना एमएमएतर्फे मंगळवारी गुढीपाडव्यानिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. सॅन्डोज कॉलनीपासून सुरू झालेल्या या शोभायात्रेत एमएमए सीईटीपीचे चेअरमन संभाजीराव पठारे, अशोक तलाठी, विनोद देशमुख, अशोक महाडिक, अजित देशमुख यांच्यासह कारखान्यातील अधिकारी, कर्मचारी तसेच महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. या शोभायात्रेत पुरुष व महिलांनी पारंपरिक वेशभूषा परिधान केल्याने ही शोभायात्रा खास आकर्षण ठरली. ढोल व लेझीम, खालू पथकात महिला सामील झाल्या होत्या. या शोभायात्रेचा समारोप हुतात्मा स्मारक येथे करण्यात आला. या शोभायात्रेत जय मल्हार, छत्रपती शिवाजी महाराज, माँ जिजाऊ आदिंच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. (वार्ताहर)

Web Title: Welcoming the celebration of Marathi New Year in the District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.