म्हसळा : म्हसळा तालुक्यातील आंबेत हद्दीतील गोरेगाव-मंडणगड मार्गावर म्हसळा वनखात्याकडून महेश यशवंत कासारे (रा. गोवळ-मंडणगड, जि. रत्नागिरी), यास खैराच्या लाकडांच्या तस्करी प्रकरणी २० नोव्हेबर रोजी अटक केली होती. त्यास पुन्हा शनिवारी श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने १५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पिकअप वाहन विनापास सोलीव खैर भरून गोरेगाव रस्त्यावरून मंडणगड येथे जात असताना आंबेत हद्दीत म्हसळा वनविभागाच्या पथकाने सापळा रचून सोमवार, २० नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वाजता पकडले. वाहनामध्ये १७ हजार ९०० रुपये किमतीचे सोलीव खैराचे १४५ नग जप्त करण्यात आले व वाहनमालक महेश यशवंत कासारे यास अटक केली. भारतीय वन अधिनियम १९२७, महाराष्ट्र वन नियमावली २०१४ चे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. मंगळवार, २१ नोव्हेंबर रोजी आरोपीला श्रीवर्धन न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यास प्रथम तीन दिवसांची पोलीस कोठडी दिली होती. ती संपल्यावर पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने १५ दिवसांकरिता न्यायालयीन कोठडी दिली आहे.रोहा उप वनसंरक्षकांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा वनखात्याचे वनक्षेत्रपाल व्ही. एन. पवळे, वनपाल एस. जी. म्हात्रे , वनपाल एस. एस. चव्हाण , वनपाल ए. बी. आहिरे, वनपाल आर. बी. बनसोडे या पथकाने कारवाई केली.खैर तस्करी संबंधित आरोपींचा लवकारात लवकर तपास करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल व सदर आरोपींचा इतर वनगुन्ह्यात सहभाग आहे का? याबाबत तपास करण्यात येईल.- व्ही. एन. पवळे,वनक्षेत्रपाल, म्हसळा
म्हसळा तालुक्यात खैर तस्करास अटक, वनखात्याची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 3:35 AM