पनवेलकरांना विहिरींचा आधार, पाण्यासाठी गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2018 03:17 AM2018-12-22T03:17:27+5:302018-12-22T03:17:42+5:30

डिसेंबरमध्येच पनवेलकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे.

The wells of water for Panvelkar, the crowd for water | पनवेलकरांना विहिरींचा आधार, पाण्यासाठी गर्दी

पनवेलकरांना विहिरींचा आधार, पाण्यासाठी गर्दी

Next

- वैभव गायकर
पनवेल : डिसेंबरमध्येच पनवेलकरांना तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे नागरिकांनी विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. कपडे व इतर कामांसाठी या पाण्याचा वापर केला जात असून, शहरातील सर्व विहिरींची साफसफाई करून त्या पाण्याचा योग्य वापर करण्याची मागणी होत आहे.
राज्यातील स्वत:च्या मालकीचे धरण बांधणारी पनवेल ही पहिली नगरपालिक होती. १५० वर्षांपूर्वी तेव्हाचे लोकप्रतिनिधी व प्रशासनाने पाणीपुरवठा योजनांचे उत्तम नियोजन केले होते. देहरंग धरण १९४८ मध्ये बांधून शहराला पाणी पुरविण्याची सोय केली होती. याशिवाय वडाळे, कृष्णाळे, देवाळे, लेंडाळे, विश्राळे व डुंडाळे तलावांमधील पाण्याचा वापर केला जात होता. याशिवाय शहरांमधील विहिरींचाही योग्य वापर केला जात होता. दुर्बेबाग बागेतील व खांदे विहीर योजना तेव्हा सुरू होती. नंतर शहर वाढत गेले; परंतु गरजेप्रमाणे पाणीपुरवठ्यासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. शहरामधील विहिरींचाही योग्य वापर करण्यात आला नाही. सद्यस्थितीमध्ये पनवेल शहरामध्ये वर्षभर पाणी असलेल्या २५ पेक्षा जास्त विहिरी आहेत. संपूर्ण महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये ही संख्या अजून जास्त आहे. यापूर्वी विहिरींमधील गाळ काढण्याकडे व स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आले. परंतु सद्यस्थितीमध्ये याच विहिरी पनवेलकरांसाठी आधार ठरू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी एक दिवसाआड पाणी दिले जात आहे. काही ठिकाणी अनेक दिवसांपासून पुरेसे पाणी मिळत नाही. यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. नागरिकांनी आतापर्यंत अडगळीत पडलेल्या विहिरींचा आधार घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपासून विहिरींवर पाणी भरण्यासाठी व कपडे धुण्यासाठी गर्दी वाढली आहे. विहिरींमधील गाळ बाजूला करून त्या पाण्याचा वापर केला जात आहे. या विहिरींचा गाळ काढून त्या स्वच्छ केल्या असत्या तर शहरवासीयांना त्याचा लाभ झाला असता, अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
पनवेलमध्ये यापूर्वीच्या दुष्काळी स्थितीमध्ये तत्कालीन नगरपालिका प्रशासनाने विहिरींमधील पाण्याचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. विहिरींची साफसफाईही केली होती. नुकत्याच झालेल्या महासभेमध्ये पाणीटंचाईचे पडसाद उमटले. महापालिका क्षेत्रातील बोरचे सर्वेक्षण करून त्या पाण्याचा वापर करण्याच्या पर्यायावरही चर्चा झाली. याच पद्धतीने महापालिका कार्यक्षेत्रामधील विहिरींचे तातडीने सर्वेक्षण करावे व नागरिकांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी होऊ लागली आहे.

पाणीचोरी प्रकरणी दोघांवर गुन्हे
पनवेल महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रावर येणारी पाइपलाइन फोडून त्यातील पाण्याची चोरी करून जारने पाणीविक्र ी करणाऱ्या दोन आरोपी विरोधात शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित दत्तात्रेय वारदे (३८, पनवेल ), रमेश मंगल दिवाकर (३२, पनवेल) अशी आरोपींची नावे आहेत. अमित वारदे व रमेश दिवाकर यांनी एका पत्र्याच्या शेडमध्ये बेकायदेशीररीत्या महापालिकेच्या पाइपलाइनमधून पाणीचोरी केली आहे. पाइपलाइनला छिद्र पाडून या छिद्रातून पाणी मोटारच्या साहाय्याने ओढून काही मीटर अंतरावर खेचले जात असे. येथून पाणीचोरी करून पनवेल तालुक्यातील देवीचा पाडा, शिरवली, चिंध्रण या भागात या बेकायदा मिनरल वॉटर प्लाण्टमधून पाणी विकले जात असल्याची माहिती देण्यात आली. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या सतर्कतेमुळे ही चोरी उघडकीस आली होती. शहर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय घुमे करत आहेत.
 

Web Title: The wells of water for Panvelkar, the crowd for water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड