गणपतीच्या गावात काय चाललंय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2024 11:49 AM2024-07-28T11:49:02+5:302024-07-28T11:49:27+5:30
दादर, जोहे, हमरापूर अशी १० पेक्षा अधिक गावे दरवर्षी २०० कोटींवर उलाढाल करत आहेत.
नीलेश पाटील. रिमझिम पाऊस... वाऱ्यावर डोलणारी भाताची शेते... अशा मनाला उभारी देणाऱ्या उत्साहवर्धक वातावरणात गाडीने वेग घेतला. उरण आणि पेण तालुक्यांना जोडणाऱ्या दादर खाडी पुलावर आल्यानंतर हे चित्र काही क्षणात बदलले. येथील हिरवाईला वेगाने भेदून पाताळगंगेचा प्रवास अरबी समुद्राकडे निघाला होता. दादर खाडीवरील पुलावरून झोकात वळण घेऊन पुढे जाताच रस्त्याच्या उजव्या बाजूच्या काचेच्या भल्यामोठ्या शो-केसने लक्ष वेधले. ‘मंगलमूर्ती कला आर्ट दादर’ असा फलक असलेली ही कार्यशाळा होती. गणपतीच्या गावाला आपण आल्याची ती पहिली चाहूल होती. सुबक मूर्ती घडविण्यात पेणच्या कलाकारांचा हात कुणीही धरणार नाही. ५० वर्षांपूर्वी पेण हेच मूर्तींचे केंद्रबिंदू होते. त्यानंतर १०-१५ वर्षांत या कलेचा केंद्रबिंदू हळूहळू सरकू लागला. परिणामी अरबी समुद्राच्या कुशीत विसावलेली, दुर्गम म्हणून ओळख असणारी दादर, जोहे, हमरापूर अशी १० पेक्षा अधिक गावे दरवर्षी २०० कोटींवर उलाढाल करत आहेत.
हमरापूर विभाग संघटनेचे अध्यक्ष भाई मोकल यांच्याशी कळवे गावात भेट झाली. हमरापूर पट्ट्यातले हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व असलेल्या या अध्यक्षांनी पीओपी, शाडू मातीच्या मूर्तीचा विषय छेडत व्यथा मांडली. ‘मूर्तिकलेने आमची भरभराट झाली; पण प्रशासन पीओपीच्या मूर्तींबाबत संदिग्ध वातावरण निर्माण करत आहे. त्यामुळे मोठे आव्हान आहे. या मूर्ती प्रदूषण करतात हे कुठेच सिद्ध होत नाही. भाजलेली वीट व सामान्य माती यांच्यात जेवढा फरक आहे, अगदी तसाच फरक शाडू व पीओपी यामध्ये आहे.’ असे भाई यांनी ठासून सांगितले.
कार्यशाळांमध्ये काम कसे चालते? कलाकार करतात तरी काय? असे एक ना अनेक प्रश्न प्रवासादरम्यान मनात रुंजी घालत असतात. पेण शहराकडे जाणाऱ्या या रस्त्याच्या दुतर्फा आता पक्क्या भव्य शेडमध्ये कार्यशाळा अर्थात मूर्तीचे कारखाने सुरू आहेत. हमरापूर पट्ट्यात दरवर्षी १० लाखांपेक्षा अधिक मूर्ती घडविण्यात येतात; परंतु हीच स्थिती कायम राहील याची शाश्वती देता येत नाही. अधिक पैशांसाठी स्थानिक कलाकार राज्याबाहेर जात आहेत. जोहे गावाच्या वेशीवरच संकल्प सिद्धी कला दर्शन या प्रसिद्ध कला केंद्राच्या रवींद्र मोकल यांनी स्वागत केले. १५- २० वर्षांपासून मोकल कलेत घट्ट पाय रोवून आहेत. गणेशमूर्ती घडविणे ही एक साधना आहे, असेदेखील मोकल सांगतात.
२० प्रक्रियांनंतर खुलते रूप
गणेश मूर्ती सुकल्यानंतर खऱ्या अर्थाने रंगरंगोटीच्या कामाला सुरुवात केली जाते. आठ ते दहा जणांचे हात गणेशमूर्ती पूर्ण करण्यासाठी लागले जातात.
शाडू, पीओपी आणि कागदाच्या लगद्यापासून गणेश मूर्तीची निर्मिती केली जाते. मूर्ती तयार केल्यानंतर ती सुकविण्यासाठी आधी उन्हामध्ये ठेवली जाते.
पावसाळ्यात हॅलोजनच्या सहाय्याने मूर्ती सुकवली जाते. मूर्तीं सुकण्यास आठ ते दहा दिवसांचा कालावधी लागतो.
गणेश मूर्ती सुकल्यानंतर तिला आकार देण्यास सुरुवात केली जाते. मूर्ती पूर्ण करण्यासाठी २० प्रक्रिया पार पाडाव्या लागतात.