कोणता झेंडा घेऊ हाती म्हणण्याची वेळ; राजकारणात कार्यकर्त्यांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2019 12:01 AM2019-04-21T00:01:33+5:302019-04-21T00:02:08+5:30
आपल्या उमेदवारास विजयी करण्यासाठी स्पर्धा
माथेरान : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यासह देशात सर्वत्रच प्रचाराला उधाण आलेले असून, जो तो आपापल्या परीने आपल्या युती अथवा आघाडीची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसत आहेत. पाच वर्षांपूर्वी राजकीय मतभेद असणारे, एकमेकांना पाण्यात पाहणारे आणि इभ्रतीसकट लाखोली वाहणारी राजकीय मंडळी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांनासुद्धा आमिषे दाखवून गल्लीबोळात गळ्यात गळा घालून मिरवताना दिसत आहेत. यापूर्वी कधीही एवढ्या खालच्या थराला राजकारण गेले नव्हते, ते सध्या मतदारवर्ग उघड्या डोळ्यांनी अनुभवत आहेत. प्रत्येक सभेला एक करमणूक म्हणूनसुद्धा मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहावयास मिळत आहे. एकमेकांविरोधात रणशिंग फुंकून आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. यामध्ये अल्पावधीतच राजकीय संन्यास घेणारी मंडळीही त्याच दिमाखात आजही आपल्या भूमिका मांडत आहेत. ज्यांना पक्षाने उमेदवारी दिली नाही त्यांनी पक्ष बदल करून दुसऱ्या पक्षाच्या झेंड्याखाली गुमान काम करीत आहेत. एकंदरच परिस्थितीचे अवलोकन करता या राजकारण्यांना स्वाभिमान राहिलेला नाही. सर्व नैतिक मूल्ये आणि जबाबदारी विसरून केवळ उमेदवारी मिळावी म्हणून आपला हक्क, स्वाभिमान गहाण ठेवलेला आहे. त्यातच धर्मरक्षण करण्यासाठी कुणीही पुढाकार घेत नसून केवळ संसदेत खुर्ची मिळावी, यासाठी खटाटोप सुरू आहे.
एक दिवसाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कुठल्याही एका पक्षाची सत्ता स्थापन होणार आहे. तद्नंतर पुन्हा ही राजकीय मंडळी एकोप्याने, गुण्यागोविंदाने एकत्र नांदणार आहेत. पुन्हा पाच वर्षे एकमेकांची उणीधुनी आणि विरोध करणे हे कायमस्वरूपी राहणार आहेच. या राजकारण्याच्या निवडून येण्यासाठी सुरू असलेल्या भांडणात बिचाºया कार्यकर्त्यांचे हाल होताना दिसत आहेत. पक्षश्रेष्ठींनी हुकूम सोडल्यावर ज्या पक्षाशी काडीचेही घेणे-देणे नाही. अन्य पक्षावर अथवा त्या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर अगोदर असणाºया रागावरही विरजन टाकून नाईलाजाने कामे करावी लागत आहेत.
युतीमध्ये अथवा आघाडीमध्ये त्या त्या पद्धतीने झेंडे गळ्यात घालून मिरवावे लागत आहे. निवडणुका पूर्ण झाल्यावर केवळ कार्यकर्ते एकमेकांविरोधात दंड थोपटत असतात. मात्र, याबाबत नेतेमंडळी अथवा पक्षश्रेष्ठी ‘ब्र’ शब्द काढीत नाहीत. सध्या तर सोशल मीडियावर विविध व्यंगचित्र आणि बॅनर बनवून, व्हिडीओ क्लिप बनवून एकमेकांच्या विरोधात पक्षाचे कार्यकर्ते आगपाखड करत आहेत. त्यामुळे खूपच खालच्या पातळीवरचे राजकारण नेतेमंडळी कार्यकर्त्यांमार्फत करवून घेत आहेत. या निवडणुकांमध्ये प्रामुख्याने मुख्य कार्यकर्त्यांची झोळी भरली जाते तर अनेकांना फक्त दोन वेळचे जेवण अथवा ओल्या-सुक्या पार्ट्या देऊन एकप्रकारे मनोरंजन केले जाते.
राजकीय नेत्यांना निवडणूक जिंकण्यासाठी पैशाने पैसा खेचायचा ही वृत्ती अंगीकारली आहे.