मुंबई/रायगड - राज्यात गेली पंधरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे संताप व्यक्त होत असताना मनसेने रविवारपासून कोकण जागर यात्रेचा प्रारंभ केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेतून राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. तसेच, आंदोलक मनसैनिकांवर होत असलेल्या कारवाईलाही प्रत्युत्तर दिले. दरम्यान, येथील यात्रेत अमित ठाकरेही सहभागी झाले आहेत. या यात्रेदरम्यान, मनसेचे पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांनीही सहभाग घेतला असून मंत्री महोदयांवर जोरदार टीका केलीय. तसेच, सरकारला एकप्रकारे इशाराही दिलाय.
रायगड जिल्ह्यातील कोलाड येथे जागर यात्रेदरम्यान बोलताना मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी थेट इशाराच दिला. अस्वलाच्या अंगावर ४-५ केस वाढले तर काही फरक पडत नसतो. मनसैनिकांना केसेस होतील असे कुणी आम्हाला सांगू नका, आम्ही त्याला घाबरत नाही. तसेच, आज जशी यात्रा आहे, तशा यात्रा पुन्हा होतील हा विश्वास आमच्यावर ठेऊ नका. कारण, संयम जर सुटला तर कोणपण फुटला हे सांगता येणार नाही.
मंत्री बोलत आहेत की, महाराष्ट्र सैनिक उठतो आणि कुठेतरी रस्त्यावर जाऊन नुकसान करतो. पण, मला वाटतं ज्याला जी भाषा कळते, त्या भाषेत समजून सांगणार पक्ष म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण सेना असल्याचं मोरे यांनी म्हटलं. निवडणुका जवळ आल्या की आंदोलन व्हायला लागले, असं समजायंचं, असे मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं. पण, सामंतसाहेब, तुम्हाला आज कळाल असेल की निवडणुका जवळ आल्या आहेत. मात्र, तुम्ही जेव्हा पक्ष बदलला तेव्हाच आम्हाला कळालं निवडणुका जवळ आल्या आहेत, असे म्हणत उदय सामंत यांच्यावर पलटवार केला.
जागर यात्रा ही आंदोलनाचा सभ्य मार्ग - राज ठाकरे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग असल्याचे सांगत, सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत मिळत नाही, अशी भावनिक साद घालत राज ठाकरेंनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवर ते म्हणाले, जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा. कोकणी बांधवांना गेली अनेक वर्षे खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतंही असो, आजचं असो किंवा कालचं. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नसते, असा इशाराही त्यांनी दिला.