‘वेदांता’ राज्याबाहेर जात असताना, खासदार कुठे होते? आदित्य ठाकरे यांचा कर्जतच्या सभेत सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2024 09:30 AM2024-05-11T09:30:49+5:302024-05-11T09:31:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कर्जत : ‘वेदांता’चा प्रकल्प राज्याबाहेर जात असताना, विद्यमान खासदार कुठे होते? असा सवाल उद्धवसेनेचे आमदार आदित्य ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कर्जत : ‘वेदांता’चा प्रकल्प राज्याबाहेर जात असताना, विद्यमान खासदार कुठे होते? असा सवाल उद्धवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांनी कर्जतमध्ये उपस्थित केला.
कर्जतमधील लोकमान्य टिळक चौकात इंडिया आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्या प्रचारासाठी गुरुवारी रात्री सभा झाली. यावेळी शिवसेना उपनेते सचिन अहिर, सल्लागार बबन पाटील, शेकापचे जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुरेश टोकरे यांसह पदाधिकारी उपस्थित होते.
मावळ मतदारसंघात वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येत होता. या प्रकल्पामुळे एक लाख तरुणांना रोजगार मिळणार होता. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कंपनीसोबत बैठक घेतली आणि हा प्रकल्प राज्याबाहेर गेल्याची टीका त्यांनी केली. यावेळी मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर, काँग्रेस प्रदेश सरचिटणीस श्रीरंग बरगे यांचीही भाषणे झाली.