पनवेल: पनवेल महानगरपालिकेचे मुख्यालय पनवेल शहरातील ऐतिहासिक नगरपरिषदेच्या इमारतीत आहे. अपुऱ्या जागेमुळे याच ठिकाणी एक नवीन ईमारत उभी करून या दोन्ही ईमारती एकत्रित करून पालिकेचे मुख्यालय याठिकाणी चालते. मात्र याठिकाणची अडगळ नेहमीच चर्चेचा विषय ठरत असुन हि अडगळ दूर करण्याची अपेक्षा नागरिक आयुक्तांकडे व्यक्त करू लागले आहेत.
नुकताच आयुक्त पदाचा पदभार स्वीकारलेले मंगेश चितळे यांनी पहिल्या दिवसापासुन पालिका कर्मचाऱ्यांना शिस्तीचे धडे दिले आहेत. परिपत्रक काढून कर्मचाऱ्यांना वेळेत हजर राहण्याची सुचना आयुक्तांनी केली आहे. त्यादृष्टीने कर्मचाऱ्यांना शिस्त तर लागली आहे. कधी नव्हे ते कर्मचाऱ्यांच्या गळ्यात ओळखपत्र झळकू लागले आहेत. मात्र आत्ता पालिका मुख्यालयातील अडगळीचा प्रश्न समोर आला आहे. पालिका मुख्यालयात आयुक्त, उपायुक्त तसेच मालमत्ता विभागाचे कार्यालय, जन्म मृत्यू नोंदणी, आवक जावक, विवाह नोंदणी आदी विभागाची कार्यालये असल्याने मोठ्या संख्येने नागरिक, लोकप्रतिनिधी याठिकाणी येत असतात. यावेळी पालिकेच्या प्रत्येक कोपऱ्यात भंगार वस्तु, रद्दी, जुनी कपाटे आदींसह बिनाकामाच्या वस्तु नजरेस पडतात. खर तर गोदामात हव्या असलेल्या वस्तु देखील पालिका मुख्यालयात दर्शनीय भागात ठेवल्याने याबाबत अनेकजण नाराजी देखील व्यक्त करतात. हि सर्व अडगळ मुख्यालयातुन काढून टाकण्याची मागणी होत आहे. पालिकेचे स्वराज्य मुख्यालयाचे काम प्रगतीपथावर आहे. हे मुख्यालय पूर्णत्वास येण्यासाठी अद्याप दोन ते तीन वर्षाचा काळावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे सध्या पनवेल शहरात असलेला मुख्यालय किमान स्वच्छ अथवा निटनिटक असावा अशी नागरिक अपेक्षा व्यक्त करत आहेत.