रायगडची महिला संसदेत कधी जाणार? पंधरा वेळा पुरुष खासदारांनीच केले नेतृत्व
By राजेश भोस्तेकर | Published: March 8, 2024 12:09 PM2024-03-08T12:09:24+5:302024-03-08T12:10:20+5:30
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही प्रमुख पक्षाकडून एकाही महिलेच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभेत रायगडचा चेहरा म्हणून महिला कधी प्रतिनिधित्व करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
अलिबाग : १९५२ ते २०१९ या पंधरा लोकसभा निवडणुकीत रायगडमधून एका वेळेस वंचित बहुजन आघाडी पक्ष सोडला तर इतर एकाही प्रमुख राजकीय पक्षाने महिला उमेदवार म्हणून महिलेला संधी दिलेली नाही. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्येही प्रमुख पक्षाकडून एकाही महिलेच्या नावाची चर्चा होताना दिसत नाही. त्यामुळे लोकसभेत रायगडचा चेहरा म्हणून महिला कधी प्रतिनिधित्व करणार, असा प्रश्न विचारला जात आहे.
लोकसभा, राज्यसभेत महिलांनाही संधी मिळावी यासाठी महिला आरक्षण धोरण संसदेत मंजूर केले आहे. रायगडमध्ये विधानसभा निवडणुकीत आतापर्यंत शेकापच्या मीनाक्षी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अदिती तटकरे या दोन महिला आमदार झाल्या आहेत. तटकरे मंत्रीही आहेत. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीतर्फे सुमन भास्कर कोळी यांना उमेदवारी दिली होती. त्यांचा निवडणुकीत पराभव झाला होता.
कोण, किती वेळा लढले?
१९८९ ते २०१९ या १५ लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बॅ. ए. आर. अंतुले यांनी सहा वेळा, शेकापचे दिनकर पाटील दोन वेळा आणि रामशेठ ठाकूर यांनी दोन वेळा असे चार वेळा संसदेत रायगडचे प्रतिनिधित्व केले. शिवसेनेचे अनंत गीते यांनी दोन, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांनी एकदा, तर अपक्ष म्हणून नाना कुंटे यांनी एकदा प्रतिनिधित्व केले आहे.