निखिल म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क , अलिबाग - दुर्गम भागातील नागरिकांना आपल्या शासकीय कामांसाठी अलिबागमधील जिल्हाधिकारी कार्यालयात यावे लागते. जिल्हाधिकारी कार्यालय बस स्थानकापासून साधारण एक किमी अंतरावर असल्याने नागरिकांना चाैकशी करीत तेथे पोहोचावे लागते, त्यातच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नामफलक नसल्याने नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालय निश्चित कुठे आहे हे समजून येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर नामफलक लावण्याची मागणी होत आहे.
रायगड जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्यालय कार्यालयासह महत्त्वाची कार्यालये शहरात आहेत. या कार्यालयांमध्ये आपल्या शासकीय कामानिमित्त जिल्ह्यातील तळागाळातील नागरिकांना यावे लागते. खरे पहाता तालुका पातळीवर शासकीय कार्यालय असताना जिल्हा कार्यालयात येण्याची वेळ येऊ नये अशी अपेक्षा आहे, तरीही काहींना जिल्ह्याच्या कार्यालयामध्ये यावे लागते ही सध्याची स्थिती आहे. अलिबाग शहरात एसटी बस स्थानकापासून सुमारे एक किलोमीटरवर हिराकोट तलाव परिसरात जिल्हाधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयामध्ये जिल्हा नियोजन कार्यालय, जिल्हा पुरवठा विभाग, खनिकर्म, भूसंपादन विभाग आदी महत्वाची कार्यालये आहेत. त्यामुळे जिल्हा भरातील नागरिक येथे येत असतात.
जिल्हाधिकारी कार्यालयाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. कार्यालयासाठी तीन प्रवेशद्वार नव्याने बांधण्यात आले आहेत. मात्र या प्रवेशद्वारावर जिल्हाधिकारी कार्यालय नावाचा उल्लेख नसल्याने जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अथवा प्रथमच येणाऱ्या नागरिकांना जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत कोणती हे निश्चित समजून येत नाही. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर कार्यालयाचे नाव असले तरी ते रस्त्यावरून स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच आजूबाजूला इतर इमारती असल्याने नव्याने येणारा नागरिक भांबावून जातो. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असूनही चाैकशी करावी लागते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर या कार्यालयांची मोठा आणि स्पष्ट नावाचा फलक असण्याची गरज आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर कार्यालयाचे नामफलक नसला तरी जिल्हाधिकारी यांच्या निवासी बंगल्यासमोर त्यांच्या नावाचे नामफलक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे येथे शासकीय कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अधिकाऱ्यांचे निवासी बंगले सहज दृष्टीस पडतात. मात्र जिल्हाधिकारी कार्यालय कुठे आहे रे भाऊ... म्हणत फिरावे लागते.