कर्जत : माथेरानमध्ये माल वाहतूक करणाऱ्या घोड्यांचा थांबा असलेला दस्तुरी नाक्यावरील मालधक्का परिसर घोड्यांच्या लिदीमुळे भरला आहे. त्या ठिकाणी साठवून ठेवलेल्या लिदीचे ढीग लागले आहेत. ही लीद तेथून भरून कचरा डेपोवर नेण्याची गरज आहे; मात्र ती अद्याप उचलण्यात आलेली नाही.
पावसाच्या पाण्यात ही लीद पाण्यासोबत वाहून जंगलात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे जंगलातील वनसंपदेचे मोठे नुकसान होऊ शकते. त्यामुळे वन विभाग आणि नगर परिषद यांनी त्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्याची गरज आहे. माथेरानमध्ये घोडा हेच वाहन असून पर्यटक तसेच माल वाहून नेणारे एक हजारच्या आसपास घोडे आहेत.
शहरात लागणाऱ्या दैनंदिन वस्तूंचा पुरवठा हा तेथे वाहनांना बंदी असल्याने घोड्याच्या पाठीवर साहित्य नेऊन केला जातो. दस्तुरी येथील माल धक्क्यावर साठवून ठेवलेले साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा दस्तुरी ते माथेरान शहर असा घोड्यांच्या माध्यमातून केला जातो.
माल वाहतूक करणारे घोडे ज्या ठिकाणी थांबून असतात आणि निवास करीत असतात. त्या माल धक्क्यावर आणि परिसरात त्या घोड्यांची लीद साठून राहिली आहे. गतवर्षी तत्कालीन पालिका मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी पुढाकार घेऊन माल धक्का आणि एमपी प्लॉट ५४ वर जमा झालेली घोड्यांची लीद उचलून कचरा डेपो येथे नेली होती. त्यामुळे तो परिसर मागील वर्षी लीदमुक्त झाला होता.
या वर्षी अद्याप ही लीद उचलली गेली नाही. याबाबत पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील असूनही माथेरानमध्ये जागोजागी कचरा पसरला आहे. हा कचराही पावसामुळे वाहत जंगलात पसरणार आहे. त्यामुळे तोही वेळीच उचलण्याची मागणी होत आहे.
वनसंपदेला असा आहे धोका?घोड्यांची लीद आणि मलमूत्र हे घातक असते. घोडे एकाच ठिकाणी सातत्याने उभे केलेले असल्यास त्यांची विष्ठा आणि मलमूत्र यामुळे त्या ठिकाणी असलेली झाडे ही काही वर्षांत मरतात. त्यामुळे ही विष्ठा किंवा लीद पावसाळ्याच्या पाण्यासोबत जंगलात वाहून गेल्यास जंगलातील झाडांचे मोठे नुकसान होऊ शकणार आहे.