ग्रामसेवकांवर कारवाई कधी
By admin | Published: October 14, 2015 02:53 AM2015-10-14T02:53:24+5:302015-10-14T02:53:24+5:30
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे.
आविष्कार देसाई , अलिबाग
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामीण भागामध्ये स्वच्छतेची व्याप्ती वाढविण्यासाठी शौचालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची प्रत्येक ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. मात्र सातत्याने पत्रव्यवहार करूनही त्याला न जुमानणाऱ्या सुमारे ११७ ग्रामसेवकांवर कारवाईचा बडगा जिल्हा परिषद प्रशासन कधी उगारणार, असा प्रश्न आहे.
येत्या पाच महिन्यांत २९८ ग्रामपंचायतींमध्ये १७ हजार १८२ शौचालय बांधणीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषदेला कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत.
रायगड जिल्ह्यात एकूण १५ तालुके असून ८२४ ग्रामपंचायती आहेत. २०१५-१६च्या कृती आराखड्यानुसार २९८ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. २९८ ग्रामपंचायतींपैकी ११७ ग्रामपंचायतींच्या एप्रिल २०१५ ते सप्टेंबर २०१५ अखेर स्वच्छ भारत मिशनमध्ये ग्रामसेवकांनी न केलेल्या कामाचे मूल्यमापन आॅनलाइन दिसत आहे. ही आकडेवारी ७ आॅक्टोबर २०१५ पर्यंतची आहे. ग्रामसेवकांसाठी सातत्याने कार्यशाळा, आढावा सभा आणि विविध प्रशिक्षणाच्या माध्यमातून सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचप्रमाणे पत्रव्यवहारही केला आहे. मात्र त्यांच्याकडून योग्य ते सहकार्य मिळत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.
२९८ ग्रामपंचायतींमध्ये २०१५-१६ या कालावधीत १९ हजार ५८२ वैयक्तिक शौचालयाच्या उद्दिष्टापैकी दोन हजार ४०० शौचालये बांधण्यात आली आहेत. त्यामुळे येत्या पाच महिन्यांत १७ हजार १८२ शौचालये बांधून पूर्ण करावी लागणार आहेत. त्यामुळे यासाठी लोकसहभागाबरोबरच ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवकांचा सहभाग अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
ग्रामसेवकांबरोबरच ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पंचायत समिती सभापती, उपसभापती, जिल्हा परिषद सभापती, सदस्य यांचाही सहभाग गरजेचा राहणार आहे.