दीडशे कोटी जातात कुठे?
By admin | Published: February 15, 2017 04:46 AM2017-02-15T04:46:08+5:302017-02-15T04:46:08+5:30
राज्यातील मोठ्या जिल्हा परिषदांपैकी एक रायगड जिल्हा परिषद आहे. १५० कोटींचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने सादर के ला.
दासगाव : राज्यातील मोठ्या जिल्हा परिषदांपैकी एक रायगड जिल्हा परिषद आहे. १५० कोटींचा अर्थसंकल्प जिल्हा परिषदेने सादर के ला. हा खर्च होतो. मात्र, समस्या सुटत नाही. मग हा पैसा जातो कुठे? असा प्रश्न केंद्रीय मंत्रीगीते यांनी शिवसेनेच्या जाहीर सभेत उपस्थित केला. वहूर जिल्हा परिषद मतदार संघ हा मुस्लीम आणि कुणबी बहुसंख्य असल्याचा धागा पकडून त्यांनी काँग्रेसच्या जातीयवादी मुद्द्यांना हात घातला. हिंदू आणि मुस्लीम या देशात एकोप्याने वागले, तर भारत देश जगाच्या पाठीवर समृद्ध देश म्हणून पुढे येईल, असे एकोप्याचे आवाहन मुस्लीम समाजाला करीत, काँग्रेसमधील ब्रिटिशनीती गीते यांनी उघड केली.
सोमवारी महाड तालुक्यातील दासगाव येथे शिवसेनेच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेनेचे जिल्हा परिषद उमेदवार जितेंद्र सावंत, पंचायत समितीचे उमेदवार सदानंद मांडवकर आणि शोएब पाचकर यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेला आ. भरतशेठ गोगावले, जिल्हाप्रमुख रवी मुंडे, उपजिल्हाप्रमुख बिपीन महामूनकर, तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, जि. प. सदस्य बाळ राऊळ, विकास गोगावले आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाडचे आ. भरत गोगावले यांनी न केलेली कामे केली म्हणून सांगणाऱ्या काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा समाचार घेतला. ‘दासगाव येथील दरडग्रस्त, औद्योगिक वसाहतीतून पिण्याचे पाणी हे प्रश्न हे नेते सोडवू शकलेले नाहीत. मात्र, पेपरबाजी केली,’ असा टोमणा आ. गोगावले यांनी लगावला. या परिसराचा विकास शिवसेनाच करेल, असा विश्वास देत, दासगाव येथील बंधाऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्याची विनंती त्यांनी गीते यांना केली. वहूर, चिंभावे येथील मुस्लीम सरपंच हे शिवसेनेचेच आहेत, असे सांगताना शिवसेना जातीयवादी नाही, असे गोगावले यांनी स्पष्ट केले.
वहूर जि. प. मतदार संघ सावित्री खाडीमुळे दुभागलेला आहे. दासगाव विभागातील कोकरे ते मोहप्रे ही एक बाजू, तर गोठ्यापासून तुडील, खुटील, गोमेंटी या भागात पसरली आहे. (वार्ताहर)