‘ते’ सपनो के सौदागर गेले कुठे?-धनंजय मुंडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2019 12:51 AM2019-04-27T00:51:58+5:302019-04-27T06:45:29+5:30
मोेदी सरकारवर टीका; नेरळ येथे आघाडीची सभा
कर्जत : मागील २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जनतेला अच्छे दिनची स्वप्ने दाखविणारे सपनो के सौदागर गेले कुठे? असा प्रश्न विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी नेरळ येथे उपस्थित केला. नेरळ येथील हुतात्मा हिराजी पाटील चौकात राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार पार्थ अजित पवार यांच्या निवडणूक प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन केले होते. त्या वेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी नरेंद्र मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
२०१४ मध्ये तत्कालीन गुजरात राज्याचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना भारतीय जनता पक्षाने आपले पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केले आणि देशभर फिरत त्यांनी अच्छे दिन येण्याची स्वप्ने जाहीर सभांतून दाखवली आणि त्या वेळी जनतेने त्या स्वप्नांना भुलून मोदींच्या हाती सत्ता दिली; पण त्या मोदी यांनी स्वत:चे बहुमत असताना काय केले? हे दाखवून द्यावे, असे आव्हान देताना धनजंय मुंडे यांनी, ती स्वप्ने, ती आश्वासने आणि ते सपनो के सौदागर २०१९ मध्ये अच्छे दिनबद्दल काही बोलत नाही. अशी टीका करीत मोदी आज देशात सर्वत्र अपयशी ठरल्याचे दिसून येत असून, राज्यात परिवर्तन आणून चोर लोकांच्या हाती सत्ता देऊ नका, असे आवाहन मुंडे यांनी केले.
धनंजय मुंडेंनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका करताना, अमित शहा यांना प्रथम अफजल खान बोलायचे आणि कोणतेही पद नसताना आर्थिक संपत्ती कमावली म्हणून ईडीकडून चौकशीची धमकी अमित शहा यांनी दिल्यानंतर उद्धव ठाकरे अफजल खानाच्या गुहेत शिरले, असा आरोप मुंडे यांनी केला. त्यांनी पुढे बोलताना, नरेंद्र मोदी चुकून कधी पंतप्रधान झाले तर ते देशात पुन्हा हुकूमशाही आणतील, अशी भीती मुंडे यांनी व्यक्त केली. या वेळी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आ. जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे, आमदार सुरेश लाड आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.