वैभव गायकर, लोकमत न्यूज नेटवर्क, पनवेल :पनवेलमधील लेडीज बारचा विषय ‘लोकमत’च्या पाठपुराव्यामुळे ऐरणीवर आला आहे. पनवेल शहर व ‘कोण’ परिसरात लेडीज बार कार्यरत आहेत. या बारमालकांची मॅनेजमेंट हा संशोधनाचा विषय आहे. बार चालवताना ते प्रत्येक घडामोडीबाबत कमालीची गुप्तता पाळतात. बारमध्ये पैशाची उधळण करणाऱ्या ग्राहकांना एक हजार रुपयांऐवजी आठशे रुपये दिले जातात. सुट्या पैशांची उधळण करण्यासाठी २० रुपयांच्या कडक करकरीत नोटा बारमालक आणतात कुठून, हा बारचालकांच्या मॅनेजमेंटचा विषय आहे.
लेडीज बारची रचना विशेष असते. बारमध्ये प्रवेश करण्यापूर्वी एक दरवाजा असतो. काही अंतरावर दुसरा दरवाजा असतो. कर्कश आवाजाने बारमध्ये धांगडधिंगा सुरू असताना बारच्या बाहेर कोणताही आवाज येत नाही. उत्पादन शुल्क विभागाच्या विविध परवानग्यांवर तर अनेक ठिकाणी विना परवाना हे बार सुरू असताना सर्वच नियमांचे काटेकोरपणे पालन होताना दिसून येत नाही.
पनवेल शहरामध्ये २० पेक्षा जास्त बार
पनवेल शहरासारख्या मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय सोसायटी परिसरात चाणक्य नामक बार आहे. ग्राहक आणि बार मॅनेजमेंट याव्यतिरिक्त तिऱ्हाईत व्यक्तीला याबाबत काहीच माहिती मिळत नाही. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बारबाबत तक्रारी करण्यास कोण पुढे येत नाही. सर्व यंत्रणांना हाताशी धरून लेडीज बार चालवले जात आहेत.
कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाची जोड हवी
पोलिसांनी या बार चालकांविरोधात उचललेला कारवाईच्या बडग्याला उत्पादन शुल्क विभागाची जोड हवी आहे, तरच नियमबाह्य चालणाऱ्या या लेडीज बार चालकांना कायद्याचा धाक बसेल.
प्रथमच १० मोठ्या बारवर कारवाई
पनवेलमध्ये वर्षानुवर्षे सुरू असलेल्या या बार चालकांविरोधात ‘लोकमत’ने थेट भूमिका घेतल्यानंतर पोलिसांनी मोठ्या स्वरूपात कारवाई केली आहे. दहापेक्षा जास्त बारवर कारवाई करून अनेकांवर गुन्हे दाखल केले गेले आहेत. ही आजपर्यंतची मोठी कारवाई आहे.