खेड : २०१४च्या निवडणुकीच्या वेळी मतदारसंघात कागदाचा कारखाना आणणार असल्याचे सांगत, शेतकऱ्यांना बांबूची लागवड करण्याचा सल्ला खा. अनंत गीते यांनी दिला. मात्र, पाच वर्षे झाली तरी तो कागदाचा कारखाना काही आला नाही, त्यामुळे यांच्या बोलण्यात येऊन बांबूची लागवड केलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले. गीतेसाहेब, कुठे आहे तुमचा कागदाचा कारखाना, असा प्रश्न महाआघाडीचे रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी खा. गीते यांना केला. ते शुक्रवारी खेड तालुक्यातील चाटाव येथे बोलत होते.पाच वर्षांपूर्वी सत्तेत बदल झाल्यावर जे आधीच्या राज्यकर्त्यांनी केले नाही ती कामे करून दाखवण्याचे आश्वासन यांनी दिले. मात्र, आघाडी सरकारच्या काळात गोरगरिबांना शिधापत्रिकेवर स्वस्त दरात मिळणारे धान्य या सरकारने बंद केले, १५ लाख खात्यात टाकण्याचे सांगितले गेले. दरवर्षी दोन कोटी रोजगाराची आश्वासने युवकांना दिली. मात्र, याउलट नोटाबंदीने असलेले व्यवसाय बुडवले. भजी तळणे, ही रोजगाराची नवी व्याख्या या सरकारने दिली. हे सरकार कुचकामी निघाले. यांनी सर्वसामान्यांचा भ्रमनिरास केला आहे, असे तटकरे म्हणाले. ३० वर्षे या मतदारसंघाने गीतेंना संधी दिली. मात्र, दहा वर्षे ते केंद्रात मंत्री असूनही त्यांनी रोजगाराची निर्मिती केली नाही, असा आरोप त्यांनी केला. निवडून आल्यानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील टोल रद्द करण्याचे तसेच रेल्वेच्या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन तटकरे यांनी दिले.
'गीतेसाहेब, कागदाचा कारखाना कुठे आहे?'
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 00:32 IST