रोहा : गेली पंधरा वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गामुळे संताप व्यक्त होत असताना मनसेने रविवारपासून कोकण जागर यात्रेचा प्रारंभ केला. हा कोणत्या सरकारचा मूर्खपणा हे माहीत नाही. या महामार्गावर पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. जगात कुठेही गेला तरी रस्ते काँक्रिटचेच असतात असे सांगत किती पैसे खायचे यालाही मर्यादा असतात, असा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोलाड येथील सभेत रविवारी केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह पत्नी शर्मिला ठाकरे व मुलगा अमित ठाकरे हे यात्रेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची पदयात्रा हा आंदोलनाचा सभ्य मार्ग असल्याचे सांगत, सरकारला जाग आणण्यासाठी हे आंदोलन करीत आहोत. रस्त्यावर पडलेला खड्डा भरता येतो, पण गेलेलं माणसाचं आयुष्य परत मिळत नाही, अशी भावनिक साद घालत त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली. मुंबई-गोवा महामार्गाच्या रखडपट्टीवर ते म्हणाले, जी माणसे तुम्हाला लुटत आली त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देत आहात. तुम्ही जागृत राहा.
कोकणी बांधवांना गेली अनेक वर्षे खड्डे सहन करावे लागतात. याचा तुम्हाला राग कसा येत नाही, असे आवाहनही त्यांनी केले. आंदोलन करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना पोलिस स्टेशनमध्ये अंडरवेअरवर बसवलं. सरकार कोणतंही असो, आजचं असो किंवा कालचं. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नसते, असा इशाराही त्यांनी दिला.
मुंबई-पुणे रस्ता देशाला दिशादर्शक१९९५ मध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबई-पुणे रस्ता दोन तासांत पार करता येईल, असा रस्ता तयार करा, असे आवाहन केले होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने मुंबई-पुणे रस्ता बनवला. तो देशाला दिशादर्शक रस्ता झाला आहे. या रस्त्यानंतरच चांगले रस्ते होऊ लागल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
तुम्ही भूमिहीन ते कोट्यधीशमुंबई-गोवा महामार्ग वेळेत व नीट न करण्याचे कारण म्हणजे अत्यंत कमी किमतीत कोकणी बांधवांच्या जमिनी विकत घेत आहेत. ज्यावेळी हा रस्ता होईल, त्यावेळी १०० पट किमतीन तुमच्या जमिनी व्यापाऱ्यांना हे लोक विकणार. त्यामुळे कोणीही जमिनी विकू नका, असे आवाहन त्यांनी केले. आपल्याकडे कुंपनच शेत खात असल्याचे सांगत आपलेच लोक आपल्या लोकांकडून कमी किमतीने जमिनी घेऊन जास्त किमतीने व्यापाऱ्यांना विकत असल्याची खंतही त्यांनी बोलून दाखवली.