लोकमत न्यूज नेटवर्क, महाड (जि. रायगड): शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड हे महाडमधील क्रांतिस्तंभाजवळ बुधवारी दुपारी मनुस्मृती दहन आंदोलन करीत असताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो फाडला. या घटनेनंतर आंबेडकरी अनुयायांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यानंतर आव्हाड यांनी या प्रकाराबाबत जाहीर माफी मागितली.
क्रांतिस्तंभावरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आव्हाड यांनी मनुस्मृतीबाबत आपले मत व्यक्त केले. या वेळी डॉ. आंबेडकरांचे फोटो कार्यकर्त्यांच्या हातात होते. मात्र, मनुस्मृती जाळण्यात येत असताना डॉ. आंबेडकरांचा फोटो त्यांनी फाडला. ही बाब लक्षात येताच आंबेडकरी अनुयायांनी जितेंद्र आव्हाड यांचा निषेध केला. त्यानंतर चूक लक्षात येताच आव्हाड यांनी जाहीर माफी मागितली. तसेच आव्हाड यांच्याबाबत महाड शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली.
डाॅ. आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी आव्हाड यांच्या निषेधाच्या घोषणा देत अजित पवार गटाने ठाण्यात बुधवारी आव्हाड यांचे फोटो पायदळी तुडवले. दरम्यान, आव्हाड यांच्या ठाण्यातील निवासस्थानाची सुरक्षा व्यवस्था पोलिसांनी वाढविली आहे.
आव्हाडांविरोधात आज भाजपचे आंदोलन
आव्हाड यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र चवदार तळ्याच्या काठी फाडल्याच्या निषेधार्थ प्रदेश भाजप तर्फे ३० मे रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार आहे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
नतमस्तक होऊन माफी मागतो: आव्हाड
मनुस्मृतीचा अभ्यासक्रमात समावेश होत असल्याचा निषेध म्हणून मनुस्मृती दहनाचे आंदोलन केले. आंदोलन करताना अनवधानाने मनुस्मृतीसोबत डॉ. आंबेडकर यांचा फोटो फाडला गेल्याचे दिसत आहे. याबाबत नतमस्तक होऊन माफी मागतो.- जितेंद्र आव्हाड, आमदार, शरद पवार गट