निखिल म्हात्रे
अलिबाग : जिल्ह्यातील विविध कंपन्या, बँकेत झालेल्या अपहाराच्या नऊ गुन्ह्यांचा येथील आर्थिक गुन्हे शाखेच्या माध्यमातून तपास सुरू आहे. यातील ३ प्रकरणांत दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. उर्वरित गुन्ह्यांचा तपास सुरू असल्याने कोट्यवधी रुपयांचा अपहार करणारे व्हाइट कॉलर गुन्हेगार खुलेआम फिरत आहेत.
आकर्षक व्याजदार, दामदुप्पट असे आमिष दाखवून काही मल्टिनॅशनल कंपन्या, पतसंस्थांनी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करून कोट्यवधींचा चुना लावून गाशा गुंडाळला. बहुतांश गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडविले आहेत. याबाबतचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करत असते. २०२० मध्ये ९ प्रकरणे आर्थिक गुन्हे शाखेकडे आली आहेत. त्यातील तीन प्रकरणांमध्ये दोषारोपत्र दाखल करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांचा तपास सुरू आहे. मात्र, गुंतवणूकदार व खातेदार आपले अडकलेले पैसे परत मिळतील या आशेने आर्थिक गुन्हे शाखेकडे चकरा मारत आहेत.
संस्थामध्ये झाला अपहारपेण अर्बन बँक घोटाळा प्रकरण जुने आहे. ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्या म्हणून ठेवीदार अर्थिक गुन्हे शाखा विभागाकडे चक्कर मारत आहे. ठेवीदारांना आपल्या ठेवी मिळाव्या म्हणून पोलीस विभागही कसोशीने प्रयत्न करत आहे. आणखी देखील या बँकेतील खातेदार ठेविदारांना न्याय मिळालेला नाही.
गाजलेला घोटाळाएका सुशिक्षित दाम्पत्याला पैसे दामदुपटीचे आमिष दाखवून त्यांचे पैसे खाली करण्यात आले. आपण टाकलेले पैसे परत मिळाले नसल्याने त्यांनी आरोपीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सतत फोन बंद आला होता. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस स्थानक गाठून तक्रार दाखल केली आहे.
आर्थिक गुन्ह्यांची प्रकरणे किचकट असल्याने त्यात तपासासाठी वेळ लागतो. याशिवाय बहुतांश प्रकरणातील आरोपी बाहेरच्या राज्यातील आहेत. त्यामुळे त्यांचा शोध लागल्याशिवाय तपासाला गती येत नाही. एकावेळी अनेक प्रकरणांच्या जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागत असल्याने कोणत्याली एका प्रकरणावर सर्व लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही. - अशोक दुधे, जिल्हा पोलीस अधीक्षक, रायगड