जलयुक्त शिवारचा पांढरा हत्ती
By admin | Published: September 9, 2016 03:09 AM2016-09-09T03:09:26+5:302016-09-09T03:09:26+5:30
जलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे.
आविष्कार देसाई, अलिबाग
जलयुक्त शिवार प्रकल्प विविध ठिकाणी राबविल्यामुळे तीन हजार ३९६ टीसीएम पाणीसाठा करण्यात प्रशासनाला यश आले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने सुमारे १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र संरक्षीत झाल्याचा दावा जिल्हा कृषी विभागाने केला आहे. यासाठी सुमारे २७ कोटी रुपये खर्ची पडल्याने एक टीसीएम पाणी संरक्षीत करण्यासाठी तब्बल ८१ हजार ९१७ रुपये खर्च झाल्याचे दिसून येते. त्यामुळे जलयुक्त शिवार योजना ही पांढरा हत्ती पोसण्याचाच प्रकार असल्याचे बोलले जाते. निकषाला धरुन वैज्ञानिक पध्दतीने योजना राबविल्यास खर्च कमी होऊ शकतो, असे मत शेतकरी संघटनेच्या प्रतिनीधींनी व्यक्त केले.
रायगड जिल्ह्यातमध्ये जलयुक्त शिवार योजनेचा प्रचंड गाजावाजा करुन योजनेचा शुभारंभ करण्यात आला. जिल्ह्यातील १४ तालुक्यातील ४५ गावांची निवड या योजनेसाठी करण्यात आली. २०१५-१६ साठी ९९१ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. यासाठी सुमारे ३२ कोटी ७५ लाख ६६ हजार रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली. त्याचप्रमाणे सिध्दीविनायक ट्रस्ट आणि साईबाब संस्थान यांनी सुमारे दोन कोटी रुपयांची मदतीचा हात दिला
होता.
२०१५-१६ या कालावधीत ९९१ पैकी ९२२ कामे पूर्ण झाली. त्यासाठी सुमारे २७ कोटी दोन लाख २१ हजार रुपये खर्च करण्यात आले. एवढ्या मोठ्या संखेने निधी खर्च केल्याने जिल्ह्यातील ठिकठिकाणी राबविलेल्या या प्रकल्पामुळे तीन हजार २९६.३९ टीसीएम पाण्याचा साठा करण्यात जिल्हा कृषी विभागाला यश आले आहे. या साठलेल्या पाण्याचा वापर १५ हजार एकर शेतीचे क्षेत्र भिजण्यास करता येणार असल्याचा दावा जिल्हा कृषी अधिक्षक विभागाने केला आहे.
त्याचप्रमाणे जलयुक्त शिवार प्रकल्पामुळे परिसरातील विहीरी, हौद यांच्या पाणी पातळीत वाढही झाल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. परंतु पाणी साठ्यात वाढ झाली याची मोजदाद कोणी केली, कशी केली असा प्रश्न विविध शेतकरी संघटनांनकडून उपस्थित केला जात आहे. जलयुक्त शिवार योजनेची वैज्ञानिक पध्दतीने अंमलबजावणी केली जात नसल्याचाही संघटनेचा सूर आहे.