कार्ले, खंडाळ्यात पांढरा कांदा काढणीची लगबग

By निखिल म्हात्रे | Published: January 21, 2024 06:48 PM2024-01-21T18:48:00+5:302024-01-21T18:48:20+5:30

विविध ठिकाणांहून ८०० हून अधिक माळींना मागणी.

White Onion harvest season in Karle Khandala | कार्ले, खंडाळ्यात पांढरा कांदा काढणीची लगबग

कार्ले, खंडाळ्यात पांढरा कांदा काढणीची लगबग

अलिबाग - तालुक्यातील कार्ले, खंडाळा येथील पांढरा कांदा काढणीला सहा दिवसांपासून सुरुवात झाली आहे. या कांद्याच्या माळी तयार केल्यावर जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यांपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. कांद्याला पुणे, मुंबई, रत्नागिरी, नवी मुंबई येथून ८०० हून अधिक माळींना मागणी असल्याची माहिती कांदा उत्पादक शेतकरी सतीश म्हात्रे यांनी दिली.

अलिबाग तालुक्यातील कार्ले येथील कांद्याला चांगली पसंती आहे. गेली अनेक वर्षांपासून या परिसरातील पांढऱ्या कांद्याला पर्यटकांसह स्थानिकांकडून मागणी आहे. येथील निम्म्याहून अधिक शेतकरी कापणीची कामे झाल्यावर आठ ते दहा दिवसांत कांद्याची लागवड करतात. नोव्हेंबरमध्ये कांद्याची लागवड करण्यात आली होती. दोन महिन्यांत कांदा काढणी योग्य झाली आहे. गेली दोन दिवसांपासून कांदा काढणीला सुरुवात करण्यात आली आहे. कांदा काढणीपासून त्याच्या माळी तयार करण्यासाठी स्थानिक कामगारांना रोजगार मिळू लागला आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे. सतीश म्हात्रे यांनी त्यांच्या दोन एकर जागेत कांद्याची लागवड केली आहे. अलिबागचा कांदा चविष्ट व औषधी गुणधर्मयुक्त असल्याने त्याला वेगवेगळ्या जिल्ह्यांतून, राज्यातून मागणी असते. या कांद्याला रायगड जिल्ह्यातील बाजारपेठांसह रत्नागिरी, नवी मुंबई, वाशी, मुंबई, पुणे येथून मागणी करण्यात आली आहे.
 
दरवाढीची शक्यता
वाढत्या महागाईमुळे मजुरांच्या दरातही वाढ झाली आहे. परिणामी, कांद्याचे दर यंदा दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यंदा बाराशे रुपये चार माळींमागे ग्राहकांना मोजावे लागणार आहेत. त्यामुळे माळीमागे तीनशे रुपये द्यावे लागणार आहेत.
 
गेली अनेक वर्षांपासून कांद्याची लागवड करीत आहे. कांद्याला जीआय मानांकन प्राप्त झाल्याने अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. कांदा काढणीला सुुरुवात झाली असून, २६ जानेवारीपूर्वी बाजारात दाखल होईल, असा विश्वास आहे.
- सतीश म्हात्रे, कांदा उत्पादक शेतकरी, कार्ले-अलिबाग.
 
रेन वॉटर पद्धत फायदेशीर
यंदा कांद्याला लागवडीनंतर पाणी देण्यासाठी रेन वॉटर पद्धतीचे नियोजन करण्यात आले होते. पावसाच्या पाण्याप्रमाणे पिकाला पाणी दिले जाते. त्यामुळे वेळेबरोबरच पाण्याची बचतही झाली आहे. यंदा कांद्यासाठी पोषक वातावरण असून, अवकाळी पावसाचा फारसा परिणाम उत्पादनावर झाला नाही. आतापर्यंत सुमारे साडेतीन लाख रुपयांचा खर्च आला असल्याची माहिती उत्पादकांनी दिली.
 

Web Title: White Onion harvest season in Karle Khandala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :alibaugअलिबाग