लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : तालुक्यातील कार्ले, खंडाळे व अन्य परिसरात पांढऱ्या कांद्याची लागवड सुरू असताना पांढरा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. अवकाळी पावसासह धुक्यामुळे कांद्यावर मर व करपासारख्या रोगाचा धोका कायमच आहे. त्यामुळे यावर्षी तालुक्यात कांद्याच्या उत्पादनावर ५० टक्क्यांपेक्षा अधिक परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
अलिबागचा कांदा आकाराने मध्यम असून, चविष्ट व औषधी असल्याने या कांद्याला ग्राहकांकडून मोठ्या प्रमाणात मागणी असते. पांढऱ्या कांद्याला मागणी वाढू लागल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढू लागली आहे. अलिबाग तालुक्यातील कार्ले, खंडाळे, नेहुली, बामणगाव व रामराज परिसरात कांद्याची लागवड केली जाते. सर्वांत जास्त कार्ले परिसरात प्रत्येक घरातील शेतकरी पांढऱ्या कांद्याची लागवड करतात, तर रोहा तालुक्यातील खांब व देवकान्हे या गावांमध्ये काही प्रमाणात कांद्याची लागवड केली जाते. एकरी सुमारे सहा टन, तर हेक्टरी १५ टन उत्पादन मिळते. दरवर्षी सुमारे तीन कोटींची उलाढाल या कांद्यापासून होते. या कांदा लागवडीपासून दीड हजार शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. भौगोलिक मानांकनामुळे अलिबागच्या कांद्याची एक वेगळी ओळख निर्माण होणार आहे. कांद्याला भौगोलिक मानांकन मिळणार असल्याने अलिबाग तालुक्यातील कार्लेसह परिसरातील शेतकऱ्यांनी यंदा कांद्याचे अधिक बियाणे घेऊन त्याची लागवड करण्यास सुरुवात केली होती. भात कापणीची कामे संपल्यावर नोव्हेंबरला पांढरा कांदा लागवडीला सुरुवात होते.
पुन्हा लागवड केलेला कांदा संकटात डिसेंबरमध्ये पडलेल्या अवकाळी पावसामुळे कांद्याची रोपे पाण्यात कुजली. शेतकऱ्यांनी पांढरा कांद्याची पुनर्लागवड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अवकाळी पावसानंतर आता जिल्ह्यामध्ये पडणाऱ्या धुक्याचा परिणाम होत असून, कांदा पिकावर करपा रोगाचा धोका वाढला आहे.