"ज्यांनी एवढं मोठं केलं..."; शरद पवारांचं घर कुणी फोडलं? शिवसेना नेत्याचा मोठा गौप्यस्फोट, बड्या नेत्याचं नाव घेतलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2024 03:26 PM2024-04-22T15:26:15+5:302024-04-22T15:29:11+5:30
आता शरद पवारांचे घर कुणी फोडले? यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी एका बड्या नेत्याचे नाव घेत मोठा गोप्यस्फोट केला आहे.
संपूर्ण राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. सर्वच पक्ष जबरदस्त प्रचार करत आहे. महत्वाचे म्हणजे, दोन शिवसेना आणि दोन राष्ट्रवादी काँग्रेस हे फुटीनंतर पहिल्यांदाच निवडणुकीच्या रणांगणात उतरले आहेत. प्रचारादरम्यान एका पक्षाचे नेते दुसऱ्या पक्षाच्या नेत्यांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. यातच, आता शरद पवारांचे घर कुणी फोडले? यासंदर्भात शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे उमेदवार अनंत गीते यांनी एका बड्या नेत्याचे नाव घेत मोठा गोप्यस्फोट केला आहे. ते रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे एका सभेत बोलत होते.
गीते म्हणाले, "पक्ष फोडला इथपर्यंत मी समजू शकतो. राजकारणात या गोष्टी घडतात. पण केवळ पक्ष नाही फोडला घरही फोडलं. ज्या शरद पवारांनी एवढं मोठं केलं त्या पवार साहेबांचं घर फोडलं. आता ज्या शरद पवार साहेबांचं घर फोडलंय, आज जवळ जवळ 84 वर्ष त्यांचं वय आहे. या शेवटच्या काळात या वेदना त्यांना दिल्या आहेत. हे फोडण्याचं काम केलं कुणी? या सर्वांचा सूत्रधार..., कोण आहे जोरात सांगा... अरे पवार साहेबांचं घर कोणी फोडलं... नावच आहे 'तट-करे'."
शरद पवार गीतेंना काय म्हणाले? -
"पवार साहेबांचं घर त्याने (सुनिल तटकरे) फोडलं आणि याचं शल्य त्यांच्या (शरद पवार) हृदयात आहे. सरकार गेले, आमदार गेले खासदार गेले, याचे दुःख त्यांना नाही. त्यांच्याकडे क्षमता आहे. ते नव्याने आणखी जन्माला घालू शकता. पण माझं घर यानं फोडलंय याला धडा शिकवल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार केलाय आणि म्हणून पवार साहेबांनी सांगितलंय, गीते मला त्याला धडा शिकवायचा आहे. म्हटलं साहेब शंभर टक्के, यावेळेला सुनिल तटकरेंना रायगडच्या राजकारणातून अनंत गीते हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही," असेही गीते यांनी यावेळी सांगितले.