रायगडचा खासदार कोण? मतदारराजा आज देणार महाकौल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 01:13 AM2019-04-23T01:13:49+5:302019-04-23T01:14:15+5:30
मतदारांमध्ये उत्सुकता, राजकीय पक्षही तयारीत
अलिबाग - लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात रायगड लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून १६ उमेदवार नशीब आजमावत असून त्यात शिवसेना-भाजप युतीचे केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस-शेकाप व मित्रपक्ष आघाडीचे सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्यात चुरशीची लढत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीच्या सुमन भास्कर कोळी यांच्यासह नामसाधर्म्याचे सुनील सखाराम तटकरे व सुनील पांडुरंग तटकरे हे दोन अपक्ष उमेदवार रिंंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून ६ वाजता मतदान पूर्ण होईल. संपूर्ण मतदारसंघात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
मतदारांसाठी २६६४ व्हीव्हीपॅट
लोकसभा निवडणुकीत पारदर्शी मतदान व्हावे, यासाठी प्रथमच दोन हजार ६६४ व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरीफायबल पेपर आॅडिट्रेल) यंत्रांचा वापर केला जाणार आहे. यासाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करण्यात आले आहे. मतदान केल्यानंतर सात सेकंदामध्ये मतदाराला पावती मिळेल. त्यावर निवडणूक चिन्ह, नाव व उमेदवाराचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक नमूद असेल. या पावतीमुळे मतदाराने दिलेल्या मताची खात्री करणे शक्य आहे.
१५० केंद्रातून होणार लाइव्ह कास्ट
रायगड लोकसभा क्षेत्रातील एकूण मतदान केंद्रांपैकी १५० केंद्रातील मतदान प्रक्रिया थेट लाइव्ह बेव कास्ट करण्यात येणार आहे. या केंद्रातील हालचालींवर निवडणूक आयोग थेट लक्ष ठेवणार आहे. विशेष म्हणजे, सदर लाइव्ह कॉस्ट केवळ निवडणूक विभागच बघू शकणार आहे.
मतदानासाठी ‘सुट्टी’ जाहीर झाली का?
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता मंगळवार २३ एप्रिल रोजी रायगड जिल्ह्यात मतदान होणार असून परक्र ाम्य संलेख अधिनियम १८८१च्या २६ च्या कलम २५ खाली सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. अत्यावश्यक सेवा देणारी दुकाने व आस्थापना वगळून सर्व दुकाने, आस्थापना, कारखाने येथील कामगार कर्मचारी व अधिकाºयांना पगारी सुटृी देण्यात येत असल्याचे रायगड जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी जाहीर केले आहे.
अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादींना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी दोन तासांची सवलत देता येईल.
ईव्हीएम बिघडल्यास काय आहे व्यवस्था?
ईव्हीएम मशिन बिघडण्याची शक्यता लक्षात घेता आधीपासूनच अतिरिक्त मशिन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. यामध्ये ४८५ व्हीव्हीपॅट, ३४५कंट्रोल युनिट तर ३४५ बॅलेट युनिट अतिरिक्त उपलब्ध आहेत. सेक्टर आॅफिसरच्या गाडीमध्ये हे यंत्र सुरक्षित राहतील.
सायंकाळी ६ पर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदान
मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत लागता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेत
असलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतर कुणालाही मतदान करता येणार नाही.
संवेदनशील मतदान केंद्र
रायगड मतदारसंघातील एकूण २ हजार १७९ मतदान केंद्रांपैकी १८३ शहरी भागात तर १ हजार ९९६ केंद्रे ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण भागात १० कें द्रे संवेदनशील असून त्यातील ९ केंद्रे पेण विधानसभा मतदारसंघात तर एक श्रीवर्धनमध्ये आहे. या सर्व केंद्रावर वेब कास्टिंग केले आहे.
जीपीएस यंत्रणा असलेल्या कंटेनरने ईव्हीएम पोहोचविणार
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम मशिन सील करून त्या आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणल्या जातील. तिथे पुन्हा तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका कंटेनरमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत नेहुली(अलिबाग) येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविल्या जातील.
काही गडबड झाली तर काय?
मतदानादरम्यान कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये,
त्याचबरोबर असा अनुचित प्रसंग उद्भवल्यास केवळ १० ते १५ मिनिटांत अतिरिक्त पोलीस तेथे पोहोचू शकेल असे त्रिस्तरीय पोलीस बंदोबस्ताचे नियोजन केले आहे.
रायगड जिल्हा पोलीस क्षेत्रातील २२ पोलीस स्टेशन हा पहिलास्तर, जिल्ह्यात ८० पोलीस
उप अधीक्षकांच्या नेतृत्वाखाली ८० सेक्टर असा दुसरा स्तर तर सहा पोलीस उप विभागीय अधिकारी स्तरावरील तिसरा स्तर आहे. सर्व स्तरावर तेलंगणा सशस्त्र पोलीस, एसआरपी व सीआरपीएफ यांच्या तुकड्या तैनात आहेत.
कोण आहेत उमेदवार?
उमेदवाराचे नाव पक्ष
अनंत गीते- शिवसेना
सुनील दत्तात्रेय तटकरे- राष्ट्र.काँग्रेस
नथुराम हाते- ब.मु.पा.
सुमन कोळी- व.ब.आ.
मिलिंद साळवी- बसपा
मधुकर खामकर- अपक्ष
संदीप पार्टे- बमपा
सुभाष पाटील- अपक्ष
संजय घाग- अपक्ष
गजेंद्र तुरबाडकर- क्र ाजसे
प्रकाश कळके- भाकिपा
अविनाश पाटील- अपक्ष
योगेश कदम- अपक्ष
मुजफ्फर चौधरी- अपक्ष
सुनील तटकरे- अपक्ष
सुनील तटकरे- अपक्ष