आविष्कार देसाई
रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये २०१४ च्या तुलनेत २०१९ च्या निवडणुकीत मतदानाचा टक्का सुमारे दोन टक्क्यांनी घसरला. २०१४ साली ६४.५७ टक्के झालेल्या मतदानाचा फायदा तीन मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते यांना, तर तीन मतदारसंघांत तटकरेंना झाला होता. २०१९ साली ६२.७७ टक्केच मतदान झाले आहे, त्यामुळे कमी झालेल्या मतदानाचा फायदा किंवा फटका कुणाला बसणार? हे मतपेटी उघडल्यावरच कळेल.
रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये १६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मात्र, आघाडीचे सुनील तटकरे आणि युतीचे अनंत गीते यांच्यामध्येच सरळ लढत आहे. जास्तीत जास्त संख्येने मतदारांनी मतदान करून निवडून द्यावे, असे आवाहन दोन्ही उमेदवारांनी केले होते. मात्र, या वेळेला कमी संख्येने मतदार मतदानाला बाहेर पडला. वाढणारे तापमान त्यासाठी काही अंशी मारक ठरल्याचे बोलले जाते.रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये यंदा सुमारे सव्वा लाख नवमतदारांची नोंदणी झाली. २०१४ साली गुहागर मतदारसंघात तटकरे यांनी मताधिक्यघेतले होते. तेथे ६४.१४ टक्के मतदान झाले होते. दापोलीमध्ये गीतेंना मताधिक्य प्राप्त झाले होते. या मतदारसंघामध्ये ६२.७१ मतदान झाल्याचा फायदा गीतेंना झाला होता. महाडमध्येही ६२.०३ टक्के मतदानाचा फायदा गीतेंनाच झाला होता. श्रीवर्धन मतदारसंघात ६४.२० टक्के मतांचा फायदा हा तटकरे यांच्यासाठी दिलासादायक ठरल्याने त्यांनी येथे लीड घेतले होते. अलिबागमध्ये सर्वाधिक ६७.९० टक्के मतदान झाले होते. त्याचाही फायदा तटकरे यांच्याच पारड्यात पडला होता. पेण विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास येथील ६५.७७ टक्के मतदानाचा थेट फायदा गीतेंना मिळाला होता, त्यानुसार गीते हे दोन हजार ११० मतांनी विजयी झाले होते.
२०१९ झालेल्या मतदानाची आकडेवारी पाहिल्यास गुहागर मतदारसंघात या वेळेला ५९.१९ टक्केच मतदान झाले आहे. २०१४ साली ६४.१४ टक्के मतदान झाल्याने तटकरेंसाठी जमेचे ठरले होते. आता तेथे झालेल्या कमी मतांचा फायदा कोणाला होणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. दापोलीमध्ये ६१.५६ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ६२ टक्के झालेल्या मतदानाचा फायदा गीतेंना झाला होता. महाड विधानसभा मतदारसंघात ५९.१९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी ६२.०३ टक्के मतदानाचा फायदा गीतेंना मिळाला होता, त्यामुळे कमी झालेले मतदान तटकरे यांच्या पथ्यावर पडणार का हे लवकरच समोर येणार आहे. श्रीवर्धनमध्ये ५९.५९ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी येथे ६४.२० टक्के मतदान झाले होते. त्याचा लाभ हा तटकरेंना झाला होता. आताच्या कमी मतांचा फटका नक्की कोणाला बसणार हे अद्याप कळायचे बाकी आहे. अलिबाग मतदारसंघामध्ये ६४.८९ टक्के मतदान झाले आहे. तर गेल्या वेळी हाच आकडा तब्बल ६७.९० टक्के होता, त्या वेळी तटकरेंच्या फायद्याचे होते. आता कमी झालेले मतदान कोणाकडे झुकते हे पाहावे लागणार आहे. पेण मतदारसंघात ६५.१७ टक्के मतदान झाले आहे. गेल्या निवडणुकीचा आकडा पाहिल्यास ६५.७७ जवळ-जवळ सारखाच आहे. तेव्हा गीतेंच्या बाजूने मतदान झुकले होते. आता पेणच्या मतदाराने कोणाच्या पारड्यात मतांचे दान टाकले हे २३ मे रोजी स्पष्ट होणार आहे.