राजकीय समझोता एक्स्प्रेस कोणाला तारणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:21 PM2019-03-15T23:21:50+5:302019-03-15T23:23:46+5:30
गीते-कदम आणि तटकरे-जाधव दिलजमाईवर ठरणार गणिते; निवडणुकीची उत्सुकता
- संकेत गोयथळे
निवडणूक लक्षात घेऊन पक्षांतर्गत मतभेद कमी करण्यासाठी उचललेले राजकीय समझोत्याचे पाऊल किती काळ ठाम राहते, यावरच शिवसेनेचे उमेदवार अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील तटकरे यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. अनंत गीते आणि रामदास कदम यांच्यामध्ये झालेली दिलजमाई तसेच सुनील तटकरे आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये झालेला समेट हे प्रत्यक्ष मतांमध्ये परावर्तीत होतात का, याचे औत्स्युक्य अधिक आहे आणि या लोकसभा निवडणुकीत गुहागर विधानसभा मतदार संघात तीच बाब महत्त्वाची ठरणार आहे.
चारवेळा रत्नागिरी लोकसभा मतदार संघ आणि दोनवेळा रायगड मतदार संघ असे तब्बल सहावेळा खासदार झालेल्या अनंत गीते यांना २0१४ ची निवडणूक खूपच कठीण झाली होती. आधीच्या निवडणुकांमध्ये हजारोंचे मताधिक्य घेणाऱ्या अनंत गीते यांना २0१४ च्या निवडणुकीत मात्र सुनील तटकरे यांच्यापेक्षा केवळ २१00 मतेच अधिक मिळाली. सध्याचे पर्यावरण मंत्री अनंत गीते यांच्याकडून त्यांना पुरेसे सहकार्य न मिळाल्याचा आरोप गीते समर्थकांकडून केला जातो. रत्नागिरीच्या या दोन्ही महत्त्वाच्या नेत्यांमध्ये फारसे सख्य नसल्याचे मुद्दे अनेकदा समोर आले आहेत. मात्र आता या दोघांनी एकमेकांशी समझोता केला आहे. अनंत गीते यांच्या मुंबईतील कार्यालयात या दोघांची सहा महिन्यापूर्वीच बैठक झाली होती. एकमेकांच्या मदतीची गरज आहे, हे लक्षात घेऊन दोघांनी समझोता केला आहे. त्यामुळे गीते यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बाब ठरणार आहे.
जी बाब गीते यांची तीच बाब सुनील तटकरे यांची. गीते आणि रामदास कदम यांच्यात जसे शीतयुद्ध होते, तसेच शीतयुद्ध सुनील तटकरे आणि गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये होते. राष्ट्रवादीचे हे दोन्ही माजी प्रदेशाध्यक्ष. अनेक वर्षे त्यांनी एकमेकांवर कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला. इतकेच नाही तर आपण रायगड लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवण्याचे इच्छुक असल्याचे भास्कर जाधव यांनी जाहीरही केले. त्यांची पक्षावर असलेली नाराजी लपून राहिलेली नाही. राष्ट्रवादीच्या संघटनात्मक बाबींमधून त्यांनी आपले अंग काढून घेतले आहे. गुहागर विधानसभा मतदार संघात शिवसेना-भाजपचे वर्चस्व मोडून काढण्यात यशस्वी झालेले भास्कर जाधव अलिकडे पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये फारसे सक्रिय दिसत नाहीत. त्यांच्या पायाला झालेल्या दुखापतीप्रसंगी शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्यासह अनेक पदाधिकारी त्यांना सर्वात आधी भेटले. राष्ट्रवादीचे नेते त्यानंतर त्यांची विचारपूस करायला गेले. त्यामुळे भास्कर जाधव यांच्याकडून सुनील तटकरे यांना किती सहकार्य होणार, हे प्रश्नचिन्हच आहे. मात्र ही बाब वेळीच ओळखून सुनील तटकरे यांनी आपला मैत्रीचा हात त्यांच्यासमोर नेला आहे. गेल्या काही महिन्यात गुहागरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यांना तटकरे-जाधव ही जोडी एकमेकांसोबत दिसली. हे किती खरे आणि किती काळ टिकणारे आहे, ते निवडणुकीनंतर स्पष्ट होईलच. पण तोपर्यंत हे दोघे एकत्र आहेत, असे मानायला हरकत नाही.
गीते-कदम आणि तटकरे-जाधव यांच्यातील जे नेते समझोता एक्स्प्रेस जास्त काळ चालवतील त्यांना गुहागरमध्ये मताधिक्य मिळेल, हे खरे आहे. ज्यांची समझोता एक्स्प्रेस बंद पडेल, त्यांना मात्र या निवडणुकीत पराभव पत्करावा लागणार, हे नक्की आहे.
गतलोकसभा निवडणुकीनंतर सर्वात प्रथम गुहागर विधानसभा मतदार संघाची निवडणूक झाली. त्यात भास्कर जाधव ३५ हजारांच्या फरकाने निवडून आले. तेथे शिवसेना आणि भाजपचे उमेदवार स्वतंत्रपणे लढले. मात्र या दोघांची मते एकत्र केल्यानंतरही भास्कर जाधव यांची मते अधिक होती. युतीचा बालेकिल्ला असलेल्या या मतदार संघात भास्कर जाधव यांनी मिळवलेले वर्चस्व पुढे जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही कायम राहिले. गुहागरमधील चारपैकी वेळणेश्वर, पालशेत, अंजनवेल हे तीन जिल्हा परिषद गट राष्टÑवादीकडे आहेत तर एकमेव तवसाळ गट शिवसेनेकडे आहे.
विधानसभेत भास्कर जाधव यांना मिळालेली आणि पुढे जिल्हा परिषद निवडणुकीत कायम राहिलेली मते यावेळी सुनील तटकरे यांच्या पदरात पडणार का, हा मुख्य प्रश्न आहे. तटकरे-जाधव समेट टिकला तर ही मते सुनील तटकरे यांना मिळतील आणि त्यामुळे गीते यांचा मार्ग अधिक खडतर होईल, हे नक्की आहे.
निवडणुका जातीधर्माच्या आधारावर लढवल्या जाऊ नयेत, असे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात समाजांकडून तशा बैठका होतात. कोकणात कुणबी समाज मोठ्या प्रमाणावर आहे. हा कष्टकरी समाज राजकारणाच्या मुख्य प्रवाहात येऊनही उपेक्षित राहिला आहे.
मात्र तरीही हा समाज निष्ठेने उभा राहतो. कुणबी समाजाचा माणूस केंद्रात मंत्री होण्यासाठी सर्वांनी पुढे या, हे आवाहन गत निवडणुकीत छुप्या पद्धतीने केले गेले. त्याला प्रतिसादही मिळाला. मात्र यावेळी काय होणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.