मधुकर ठाकूर
उरण : उरणमध्ये १० सार्वजनिक तर १०७ खासगी अशा एकूण ११७ दहिहंडी फुटणार आहेत.यामध्ये बहुतांश सार्वजनिक लाखांच्या दहीहंड्यांचा समावेश आहे.
उरण परिसरातील उरण पोलिस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक -६ तर खासगी ६० दहीहंड्या आहेत. यामध्ये भाजप,शिवसेना ( उध्दव ठाकरे गट),शिंदे गट,मनसे, राष्ट्रवादी आणि काही गोविंदा मंडळांच्या दहीहंड्यांचा समावेश आहे.तर न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ४ सार्वजनिक, खासगी -२० आणि मोरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत फक्त २७ खासगी दहीहंड्या आहेत.
तीनही पोलिस ठाण्याच्या हद्दीत एकूण १० सार्वजनिक दहीहंड्या आहेत.यापैकी काही दहीहंड्या लाखांहून अधिक, काही दहिहंडी लाखाच्या आहेत.तर काही राजकीय पक्षांनी याआधीच्या लाखाच्या दहीहंड्या ५० हजारांवर आणून ठेवल्या आहेत.सध्या जवळपास कोणत्याही निवडणूका नसल्याने राजकीय पक्षांनी दहीहंड्या लाखावरुन ५० हजारांवर आणून ठेवल्या असल्याची चर्चा सुरू आहे.उरणमध्ये भाजपने दहीहंडीच्या सलामीसाठी ११ हजार तर राष्ट्रवादीने पाच हजार रुपये रोख पारितोषिक ठेवले आहे.
मागील महिन्यांपासूनच रात्री उरण परिसरातील कोटनाका, केगाव ,बोरी आदी विविध ठिकाणच्या गोविंदा पथकांकडून नऊ थरांचा सराव केला जात आहे.त्यामुळे गुरुवारी (७) नऊ थर लावून लाखांचे लोणी कोणते गोविंदा पथक चाखतंय याबद्दल नागरिकांच्या मोठी उत्सुकता आहे.मागील वर्षी महिनाभराच्या विश्रांतीनंतर ऐन गोपाळकालात मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.त्यामूळे बाळगोपाळ तरुणांच्या उत्साहात आणखीनच भर पडली होती.यावर्षीही पावसाने दिड महिन्यांपासूनच पाठ फिरवली आहे.त्यामुळे गोविंदा पथकांसह नागरिकांनाही यावर्षीही पावसाची प्रतीक्षा लागुन राहिली आहे.