आविष्कार देसाई / अलिबागरायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानोत्तर अंदाजानंतर शेकाप हा सर्वाधिक जागा जिंकण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस यांची पीछेहाट होऊन त्याचा फायदा हा भाजपाला होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे हे राजकीय गणित जुळल्यास जिल्हा परिषदेवर शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस युतीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल होणार असल्याचे झालेल्या मतदानाच्या संख्येवरून दिसून येते. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी २१ फेब्रुवारीला मतदान पार पडले. जिल्ह्यात ७०.९७ टक्के मतदान झाले. सर्वाधिक मतदान पनवेल तालुक्यात ८० टक्के झाले, त्याखालोखाल कर्जत ७९ टक्के, खालापूर ७६ टक्के, अलिबाग ७४ टक्के असे मतदान झाले. तळा तालुक्यामध्ये सर्वात कमी ५८ टक्के मतदान झाले आहे. जास्त संख्येने झालेले मतदान हे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातील मतदान असते; परंतु जिल्ह्यात केवळ ७१ टक्केच मतदान झाल्याने ते सत्ताधाऱ्यांसाठी पूरक ठरण्याची शक्यता नाकारता येणार नाही.झालेल्या मतदानाच्या संख्येवरून शेकापला २१ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला १७ जागांचा फायदा होऊ शकतो. शिवसेनेला फक्त १३ ते १५ जागांवर समाधान मानावे लागणार असे दिसते, तर भाजपाला पाच ते सात आणि काँग्रेसला केवळ तीन ते चार जागांवर समाधान मानावे लागणार असल्याचे राजकीय चित्र आहे. भाजपाने ३९ जागांवर उमेदवार उभे केले होते. काँग्रेसच्या गेल्या निवडणुकीमध्ये काळुंद्रे, वडघर, रावे, जासई, कोप्रोली, वहुर आणि पोलादपूर येथे जिल्हा परिषदेच्या सात जागा निवडून आल्या होत्या. या वेळी मतदारांनी त्यांच्याकडे पाठ फिरवल्याचे खरे ठरले, तर त्यामध्ये घट होण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीमध्ये शेकापकडे १९ जागांचे संख्याबळ होते. शिवसेनेकडे १४ जागा होत्या. मतदारांनी त्यांच्या बाजूने कौल दिला नाही, तर त्यामध्ये एका जागेची घट होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला गेल्या निवडणुकीत २१ जागा होत्या. राजकीय विश्लेषकांनी अंदाज वर्तविला असला तरी खरे चित्र गुरुवार, २३ फेब्रुवारीला स्पष्ट होणार आहे.
कोण होणार विजयी?
By admin | Published: February 23, 2017 6:13 AM